२० उमेदवार आजमावणार नशीब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 12:44 AM2019-04-09T00:44:09+5:302019-04-09T00:44:57+5:30
जालना लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी पात्र २९ उमेदवारांपैकी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या शेवटच्या सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत ९ व्यक्तींनी उमेदवारी मागे घेतली असून २० उमेदवार पात्र ठरले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी पात्र २९ उमेदवारांपैकी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या शेवटच्या सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत ९ व्यक्तींनी उमेदवारी मागे घेतली असून २० उमेदवार पात्र ठरले आहेत. पात्र उमेदवारांना चिन्हवाटप करण्यात आले. परंपरागत चिन्ह देतानाच लॅपटॉप, ट्रॅक्टरसह शिट्टी आणि कपबशी, दूरदर्शन, रोडरोलर अशी अनेक चिन्ह अपक्षांना मिळाल्याने प्रचाराची रंगत वाढणार असल्याचे चित्र आहे.
सोमवारी पात्र ठरलेलय उमेदवारांमध्ये काँग्रेसकडून विलाास औताडे. हाताचा पंजा, भाजपकडून रावसाहेब दानवे -कमळ, महेंद्र कचरु सोनवणे बहुजन समाज पार्टी-हत्ती, उत्तम धनु राठोड, आसरा लोकमंच पार्टी-बॅटरी, गणेश शंकर चांदोडे, अखिल भारतीय सेना-गॅस सिलेंडर, त्रिंबक बाबूराव जाधव, स्वतंत्र भारत पक्ष-कप आणि बशी, प्रमोद बाबूराव खरात, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी-एअर कंडिशनर, फेरोज अली, बहुजन मुक्ती पार्टी-खाट, डॉ. शरदचंद्र वानखेडे, वंचित बहुजन आघाडी- शिट्टी, अण्णासाहेब देविदास उगले, अपक्ष-बॅट, अनिता लालचंद खंदाडे (राजपूत), अपक्ष-दूरचित्रवाणी, अरुण चिंतामण चव्हाण, अपक्ष-पेनाची निब सात किरणांसह, अहेमद रहिम शेख, अपक्ष-आॅटो रिक्षा, ज्ञानेश्वर नाडे अपक्ष-ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी, योगेश दत्तू गुल्लापेल्ली, अपक्ष-लॅपटॉप, रतन आसाराम लांडगे, अपक्ष-करनी, राजू अशोक गवळी, अपक्ष-रोड रोलर, शहादेव महादेव पालवे, अपक्ष-चावी, सपकाळ लीलाबाई धर्मा, अपक्ष-गॅस शेगडी आणि शाम सिरसाठ अपक्ष- यांना हातात ऊस घेतलेल्या शेतकऱ्याचे चिन्ह मिळाले आहे.
जालना : असाही ‘लकी ड्रॉ’
सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासह चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यात अखिल भारतीय सेनेचे उमेदवार गणेश चांदोडे तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. शरदचंद्र वानखेडे यांनी निवडणूक निशाणी म्हणून कपबशीला प्राधान्य दिले. दोन उमेदवारां प्रमाणे स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार अॅड. त्र्यंबक जाधव यांनी देखील कपबशी ही निशाणी मिळावी म्हणून मागणी केली होती. त्यामुळे यावेळी चिठ्ठी टाकून चिन्ह काढण्यात आले. त्यात चांदोडे यांना कपबशीची चिठ्ठी निघाल्याने डॉ. वानखेडे यांना शिट्टी हे चिन्ह देण्यात आले, तर अॅड. जाधव यांना गॅस सिलिंडरची निशाणी देण्यात आली.
स्टार प्रचारकांच्या दौऱ्यांकडे लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना लोकसभा मतदारसंघात सोमवार उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर खºया अर्थाने प्रचाराला प्रारंभ झाला आहे. आता उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाल्याने प्रचाराचा श्रीगणेशा होणार आहे. प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेकडून त्यांचे दिग्गज नेते मैदानात उतरणार असून, काँग्रेसकडूनही अशीच तयारी सुरू असल्याचे बोलले जाते. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब आंबेडकरांची सभाही जालन्यात होणार असल्याचे सांगण्यात आले. ते यापूर्वी महिन्याभरापूर्वीच जालन्यात येऊन गेले होते.
जालना लोकसभा मतदारसंघाचे चित्र सोमवारी स्पष्ट झाले. निवडणूक रिंगणात २० उमेदवार असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दोन बॅलेटमशीन लागणार असून, व्हीव्हीपॅटचे नवीन आदेश येईपर्यंत संभ्रम कायम आहे. सोमवारीच सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय देऊन ५० टक्के व्हीव्हीपॅटच्या मशीन वाढवाव्यात असे सूचविले आहे. परंतु अद्याप पूर्ण निर्णय आमच्या पर्यंत न आल्याने आम्ही त्या बद्दल सध्या बोलणार नसल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी स्पष्ट केले.
जालना लोकसभा मतदारसंघात स्टार प्रचारक म्हणून शिवसेनेने शेतकरी संघटनेची तोफ म्हणून ओळखले जाणारे लक्ष्मण वडले यांना जाहीर केले आहे. आता वडलेंची चांगलीच गोची होणार असून, शिवसेना-भाजप युती नसताना त्यांनी दानवेंवर कोणत्या भाषेत टीका केली, हे नागरिक अद्यापही विसरलेले नाहीत.
त्यातच आता त्यांना निवडून आणण्याचे आवाहन त्यांना करावे लागणार असल्याने त्यांची कसोटी लागणार आहे. अशी गत राज्यमंत्री अर्जुन खोतकरांची होणार आहे. त्यांनी देखील दानवेंशी दोन हात करण्याची गर्जना केली होती.
मात्र, ती नंतर त्यांनी तलवार म्यान केल्याने आता त्यांनाही फिरसे दानवे... असे म्हणत फिरावे लागत आहे.
दरम्यान जालना लोकसभा मतदारसंघात येणारा सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार यांनी बंडाचे निशाण थंड झाल्याने त्याचा लाभ आता अप्रत्यक्षपणे विलास औताडेंना होणार आहे.