तालुक्यात २० समुदाय आरोग्य अधिकारी रूजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:25 AM2020-12-25T04:25:11+5:302020-12-25T04:25:11+5:30
तालुक्यात यापूर्वी चार प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा मंजूर होत्या. त्यातही काही आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांचे ...
तालुक्यात यापूर्वी चार प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा मंजूर होत्या. त्यातही काही आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्याने रूग्णांची गैरसोय होत होती. उपकेंद्रातही डॉक्टर नसल्याने बहुतांश रूग्ण आरोग्य केंद्रात उपचारासाठी येत होते. त्यामुळे आरोग्य केंद्रात रूग्णांची मोठी गर्दी होत होती. परंतु, डॉक्टर नसल्याने रूग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. रूग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी शासनाने उपकेंद्रात समुदाय वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या निर्णय घेतला असून, तालुक्यातील २० आरोग्य केंद्रात समुदाय वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्यातील चिखली, बावणेपांगरी, कंडारी, नांदखेडा, खामगाव, आसरखेडा, अकोला, ढासला, धोपटेश्वर, गेवराई बाजार, कुसळी, ढोकसाळ, रोषणगाव, अंबडगाव, बाजार वाहेगाव, बुटेगाव, हिवराराळा, राजेवाडी, भराडखेडा, नजीकपांगरी या उपकेंद्रांत समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु, भाकरवाडी, बदनापूर या उपकेंद्रांमध्ये अद्यापही समुदाय वैद्यकीय अधिकारी रूजू झाले नाही.
सोयीसुविधांचा तुटवडा
तालुक्यातील उपकेंद्रांमध्ये शासनाने आरोग्य अधिकारी दिले आहेत. परंतु, बहुतांश उपकेंद्रांच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. इमारतींबाबत जिल्हा परिषदेला प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. परंतु, हे प्रस्ताव धूळखात पडून आहेत. बहुतांश उपकेंद्रात उपचारासाठी असलेली आवश्यक असलेली साधनसामुग्री नाही. साधनसामुग्री नसल्याने रूग्णांना आरोग्य केंद्रातच उपचारासाठी जावे लागत आहे.
तालुक्यातील २० उपकेंद्रांमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी रूजू झाले असून, हे आरोग्य अधिकारी सकाळी उपकेंद्रांवर आलेल्या रूग्णांची तपासणी करून आवश्यक ते उपचार करतील. दुपारी फिल्ड व्हिजिट करून उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमधील क्षयरोग, शुगर, कॅन्सर अशा रूग्णांची तपासणी करणार आहेत.
डॉ. योगेश सोळुंके, तालुका वैद्यकीय अधिकारी, बदनापूर