मागील वर्षीच्या खरीप हंगाम नुकसानीपोटी जालन्यातील शेतकऱ्यांना मिळणार २०३ कोटींचे अनुदान

By विजय मुंडे  | Published: June 14, 2023 07:02 PM2023-06-14T19:02:45+5:302023-06-14T19:03:37+5:30

जालना जिल्ह्यात १९ महसूल मंडळातील; 'स्वाभिमानी'च्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून केले स्वागत

203 crore subsidy to Jalana farmers due to last year's kharif season losses | मागील वर्षीच्या खरीप हंगाम नुकसानीपोटी जालन्यातील शेतकऱ्यांना मिळणार २०३ कोटींचे अनुदान

मागील वर्षीच्या खरीप हंगाम नुकसानीपोटी जालन्यातील शेतकऱ्यांना मिळणार २०३ कोटींचे अनुदान

googlenewsNext

वडीगोद्री : गतवर्षी पावसामुळे नुकसान झालेल्या खरीप पिकांच्या नुकसान भरपाईपोटी १५०० कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या शासन निर्णयानुसार जालना जिल्ह्यातील १९ मंडळांतील शेतकऱ्यांना २०३ कोटी रुपये मिळणार आहेत. या निर्णयाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी वडीगोद्री येथे फटाके फोडून स्वागत करण्यात आले.

मागील वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसाच्या नुकसान भरपाई अनुदान मदतीतून जिल्ह्यातील १९ महसूल मंडळातील शेकडो गावे वगळण्यात आली होती. फळबाग व खरीप पिकांचे नुकसान होऊनही नुकसान अनुदानाला हजारो शेतकरी मुकले होते. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयासह राज्य शासनास निवेदने देण्यात आली. तसेच वेळोवेळी पाठपुरावा करून, धरणे आंदोलन, रास्ता रोको, जिल्हा कचेरी समोर मुंडन आंदोलन करण्यात आले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, शासनाने अनुदान देण्याचा निर्णय मंत्री मंडळाच्या बैठकीत घेतला आहे. या शासन निर्णयाचे स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून स्वागत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, विद्यार्थी परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष गणेश गावडे, दादासाहेब घाडगे, जेष्ठ नेते पांडुरंग बांगर, अंकुश तारख, बाबासाहेब दखने, शिवाजी रोडी, उमेश बर्वे, श्रीधर केजभट, अजिंक्य घाडगे आदींची उपस्थिती होती.

२०३ कोटी रुपये अनुदान मिळणार
गेल्या वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या दीड ते दुप्पट पाऊस झाला होता. सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसान अनुदानातून वगळण्यात आलेल्या मंडळातील शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, यासाठी आंदोलने करण्यात आली हाेती. शासन निर्णयानुसार आता जिल्ह्यातील १९ महसूल मंडळातील ३२५ गावातील २ लाख १५ हजार शेतकऱ्यांना २०३ कोटी रुपये अनुदान मिळणार आहे.
- सुरेश काळे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

या महसूल मंडळाला मिळणार लाभ
जिल्ह्यातील आन्वा, हसनाबाद, गोसावी पांगरी, वरुड, सातोना, आष्टी, श्रीष्टी, पाचनवडगाव, विरेगाव, नेर, सेवली, वाघुळ, जालना शहर, रोशनगाव, बावणे पांगरी, दाभाडी, वडीगोद्री, कुंभार पिंपळगाव, जांबसमर्थ या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

Web Title: 203 crore subsidy to Jalana farmers due to last year's kharif season losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.