२२ हजार हेक्टरवरील सोयाबीन धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:51 AM2018-09-16T00:51:42+5:302018-09-16T00:52:12+5:30
जिल्ह्यात यंदा जवळपास ४८ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. गेल्या वीस दिवसांपासून पावसाने खंड दिल्याने ऐन शेंगा लागण्याच्या काळात सोयाबीनने माना टाकल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात यंदा जवळपास ४८ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. गेल्या वीस दिवसांपासून पावसाने खंड दिल्याने ऐन शेंगा लागण्याच्या काळात सोयाबीनने माना टाकल्या आहेत. कपाशी, तूर फुलोऱ्यात असतांना वाढ मंदावली आहे.
जालना जिल्ह्यात यंदा कपाशी प्रमाणेच सोयाबीनला शेतक-यांनी प्राधान्य दिले होते. कमी पावसात येणारे पीक म्हणून सोयाबीनची ओळख आहे. परंतू, मृग नक्षत्रात पडलेल्या जोरदार पावसामुळे पुन्हा पावसाने ओढ दिली होती, त्यानंतर थोड्या फार प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती. त्या पावसावर तग धरून असलेले सोयाबीन आता सुकू लागले आहे. जवळपास २२ हजार हेक्टरवरील सोयाबीनला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पावसाने खंड दिल्याने जिल्ह्यातील कोरडवाहू शेतक-यांचे यामुळे हाल होत आहेत. या शेतकºयांकडे पाणी देण्याची व्यवस्था नसल्याने त्यांची पिके जळाली आहेत. एकरी उत्पादनावरही पावसाच्या खंडाचा मोठा परिणाम होणार आहे. ज्या शेतक-यांकडे पाणी देण्याची सुविधा असली तरी ग्रामीण भागात विजेचे भारनियमन होत असल्याने पिकांना पाणी देणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे शेतक-यांचे डोळे आभाळाकडे लागले आहे.