२४ जणांनी घेतले ७६ उमेदवारी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:32 AM2019-03-29T00:32:35+5:302019-03-29T00:32:41+5:30
उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी २४ जणांनी ७६ उमेदवारी अर्ज नेल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना लोकसभा मतदार संघात गुरूवारपासून लोकसभेची अधिसूचना जारी झाली असून, उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी २४ जणांनी ७६ उमेदवारी अर्ज नेल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली. २४ अर्ज नेले असले तरी, पहिल्या दिवशी केवळ एक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचेही ते म्हणाले.
जालना लोकसभा मतदार संघात निवडणुकीशी संबंधित सर्व ती कामे अंतिम टप्प्यात आहेत. निवडणूक निरीक्षक म्हणून दोन वरिष्ठ अधिकारी येत असून, पवनकुमार हे जालन्यात दाखल झाल्याचे ते म्हणाले. दुसरे निवडणूक निरीक्षक हे ३ एप्रिलला येणार आहेत. निवडणुका पारदर्शकपणे आणि शांततेत व्हाव्यात म्हणून सर्व ती खबरदारी घेतली जात आहे. मतदानासाठी दिव्यांगांसाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेस गुरूपासून प्रत्यक्षात प्रारंभ झाला आहे. २८ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. अर्जाची छाननी ५ एप्रिलला होणार असून, अर्ज माघे घेण्याची अंतिम तारीख ही ८ एप्रिल ही आहे.
२३ एप्रिलला मतदान होणार असून, २३ मे रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणीसाठी औरंगाबाद मार्गावरील संकेत फूड प्रॉडक्ट या कंपनीत होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाने स्वतंत्र अॅपची व्यवस्था केली असून, त्या सीव्हीजी अॅपवर तक्रार केल्यास १०० मिनिटांत त्याची दखल घेता येणार आहे. आतापर्यंत अॅपवर दोन तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यांची सोडवणूक करण्यात आल्याचे बिनवडे म्हणाले. पत्रकार परिषदेस निवडणूक उपजिल्हाधिकारी राजीव नंदकर यांची उपस्थिती होती.
निवडणुकीवर करडी नजर
निवडणुका शांततेत व्हाव्यात म्हणून एक सीआरपीएफची कंपनी तैनात करण्यात आली असून, वॉरंट जारी झालेल्यांवर कारवाई करून त्यांना अटक करण्यात येत आहे. ६२ गुन्ह्यातील हवे असलेल्या आरोपींना अटक केली आहे. अवैध दारूवर बंधनासाठी जवळपास आचारसंहिता लागल्यावर १७६ दारू अड्ड्यांवर छापे टाकून दारूचा मोठा साठा जप्त केला आहे. ज्याची किंमत १३ लाख रूपये होते. यासह तीन आरोपींवर एमीएडीए काद्यानुसार कारवाई करण्यात आली असून, त्यांची हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे. आतापर्यंत जवळपास २४ जणांवर हद्दपारीची कारवाई केली आहे. तर आणखी ३९ जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवले असून, चार ठिकाणी चेकपोस्ट तयार केले आहेत . तसेच भरारी पथकांची स्थापना केली आहे.
- एस.चैतन्य, पोलीस अधीक्षक, जालना