भोगगाव शिवारात पंचवीस एकरातील ऊस भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:19 AM2018-02-10T00:19:40+5:302018-02-10T00:21:18+5:30

घनसावंगी तालुक्यातल्या भोगगाव येथील बारा शेतक-यांचा सुमारे २० एकरातील ऊस शुक्रवारी दुपारी भस्मसात झाला. उसाच्या शेतातून गेलेल्या विद्युत तारांमध्ये घर्षण झाल्यामुळे ही आग लागल्याचे शेतक-यांनी सांगितले.

25 acres sugarcane burned in fire in Bhoggaon farm | भोगगाव शिवारात पंचवीस एकरातील ऊस भस्मसात

भोगगाव शिवारात पंचवीस एकरातील ऊस भस्मसात

googlenewsNext

तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातल्या भोगगाव येथील बारा शेतक-यांचा सुमारे २० एकरातील ऊस शुक्रवारी दुपारी भस्मसात झाला. उसाच्या शेतातून गेलेल्या विद्युत तारांमध्ये घर्षण झाल्यामुळे ही आग लागल्याचे शेतक-यांनी सांगितले. तर गोरी-गंगाधरीतही अशाच पद्धतीने चार शेतक-यांचा पाच एकर ऊस खाक झाला. विद्युत विभागाच्या दुर्लक्षामुळे या पूर्वीही उसाच्या शेतात आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतक-यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
या वर्षी भरपूर पाणी उपलब्ध असल्याने गोदावरी परिसरात उसाचे क्षेत्र वाढले आहे. अनेक शेतक-यांनी कर्ज काढून ऊस लागवड केलेली आहे. सध्या अनेक भागात ऊस साखर कारखान्यात नेण्याच्या स्थितीत आहे. मात्र, नोंदणी सुरू न झाल्याने शेतक-यांनी ऊसतोडीला सुरुवात केलेली नाही. शुक्रवारी दुपारी भोगगाव येथील दौलत तुळशीराम गाभूड यांच्या शेतात लोंबकळलेल्या विद्युत तारांमध्ये घर्षण झाले. हवेमुळे आगीच्या ठिणग्या शेतात पडल्याने उसाने पेट घेतला. यात गाभूड यांच्या एक हेक्टर २० आर उसाला आग लागली. हवा व उसाच्या वाळलेल्या पाचटामुळे आग आणखी भडली. त्यामुळे या परिसरातील परसराम जिरे, गुलाब जिरे, बालासाहेब जिरे, माणिक गाभूड, गणेश गाभूड, भागवत गाभूड, रवींद्र गाभूड, कैलास वरगे, रामा गाभूड आदींच्या शेतातील सुमारे २० ते २५ एकर उसाचे नुकसान झाले. परिसरातील शेतक-यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग वाढल्याने शेतक-यांचा नाईलाज झाला. सध्या उसाला एकरी ७० टनांचा उतारा येत आहे. जळीत उसाला कारखान्याकडून कमी दर मिळतो. त्यामुळे या शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, सागर कारखान्याचे ऊस पुरवठा अधिकारी राधाकृष्ण काळे यांच्याशी वारंवार संपर्क करूनही त्यांनी शेतक-यांना काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतक-यांनी संताप व्यक्त केला.
-------
विद्युत विभगाच्या दुर्लक्षामुळे घटना
वीज वितरण कंपनीला परिसरातील शेतक-यांनी वारंवार तक्रारी करून, निवेदने देऊन लोंबकळलेल्या विद्युत तारा दुरुस्त करण्याची मागणी केली. मात्र, या विभागाने दुर्लक्ष केले. तसेच कारखान्यांनी वेळेवर ऊस नेला असता, तर नुकसान टळले असते, असे शेतकरी काळूजी गाभूड यांनी सांगितले.
------------
वाढलेल्या उसाचा तारांना स्पर्श
तीर्थपुरी येथील विद्युत विभागाचे शाखा अभियंता व्यंकटेश परसे म्हणाले की, या भागातून गेलेल्या एलटीच्या विद्युत तारा १९७२ पासून आहेत. उसाची वाढ झाल्याने हवेमुळे उसाचा विद्युत तारांना स्पर्श होऊन शॉर्टसर्किट होते. यापूर्वीही रामसगाव, मुरमा, भोगगाव येथे असा प्रकार घडला होता.
------------
जळालेला ऊस शंभर रुपये टन
सागर सहकारी साखर कारखान्याचे कृषी पर्यवेक्षक आर.ए. चव्हाण यांनी सांगितले की, जळालेल्या उसाची शनिवारपासून तोडणी करण्यात येईल. या उसाला प्रतिटन १०० रुपये दर दिला जाईल. जळीत ऊस लगेच काढून कारखान्यात आणल्यास वजनात घट येणार नाही.
-------------


गोरी-गंधारीतही उसाला आग
शहागड : गोरी-गंधारी शिवारात शॉर्टसर्किटने ऊस जळाला असल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. यामध्ये शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर गोरी-गंधारी शिवारातील कित्येक दिवसांपासून महावितरणकडून देखभाल दुरुस्ती करण्यात आली नसल्याने सर्वत्र तारा लोंबकळलेल्या आहेत.
गोरी-गंधारी शिवारातील गट क्रमांक १८ मधील बाबू पटेल व भाऊसाहेब जोगदंड यांच्या शेतातून विद्युत तार गेलेली आहे. देखभाल दुरुस्ती झाली नसल्याने तारा लोंबकळलेल्या आहेत. शुक्रवारी अचानक वारा आल्याने तारांची स्पार्किंग होऊन शॉर्ट सर्किट झाले. त्यामुळे बाबू पटेल व भाऊसाहेब जोगदंड यांचा प्रत्येकी एक एकर ऊस जळाला, तर बाजूच्या शेतातील शहादेव खरात, अप्पासाहेब खरात, अशोक खरात या तीन शेतक-यांचा तीन एकर ऊस जळून खाक झाला. शेतकºयांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र उपयोग झाला नाही. अग्निशमन बंब उशिरा पोहोचला. एका बंबमधील पाणी संपल्यानंतर तो परत न आल्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले.

Web Title: 25 acres sugarcane burned in fire in Bhoggaon farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.