२५० शेततळ्यांच्या टँकरमुक्त नंदापूरात दुष्काळातही फुलवली द्राक्ष, डाळिंबांची बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 04:51 PM2019-05-11T16:51:33+5:302019-05-11T16:53:30+5:30

या शिवारात सध्या ६५० एकरवर द्राक्ष, ५० एकरवर सीताफळ, ५० एकरवर डाळिंब बागा फुललेल्या आहेत.

250 agriculture lake's Nandapur village is free of water tanker at Jalana | २५० शेततळ्यांच्या टँकरमुक्त नंदापूरात दुष्काळातही फुलवली द्राक्ष, डाळिंबांची बाग

२५० शेततळ्यांच्या टँकरमुक्त नंदापूरात दुष्काळातही फुलवली द्राक्ष, डाळिंबांची बाग

Next

- संजय देशमुख

जालना : जालन्यापासून जवळच असलेल्या नंदापूर येथील ग्रामस्थांनी गेल्या दहा वर्षात जलसंधारणाच्या कामांची कास धरल्याने आज येथील जवळपास २५० पेक्षा अधिक शेततळ्यांमध्ये भरपूर पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे द्राक्ष, डाळिंब तसेच सीताफळांच्या बागा फुललेल्या आहेत, त्यामुळे या गावाने अल्पावधीत स्वत:ची पाणीदार गाव म्हणून ओळख निर्माण केली आहे. 

जालना तसा कायम दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे सिंचनाचा मोठा अनुशेष आजही कायम आहे. लघु आणि मध्यम तसेच शेततळे आणि साठवण तलावांची मोठी निर्मिती झाली. त्यावर कोट्यवधी रूपयांचा खर्च झाला. अनेक कामांमध्ये गैरव्यवहाराची प्रकरणे चर्चेत राहिली. जिल्हा परिषदेतील सिंचन घोटाळा तर संपूर्ण राज्यभर गाजला. जालन्यातील सिंचनावरील खर्चातून कंत्राटदारांची घरे भरली. परंतु शेतजमिनी मात्र ओसाडच राहिल्या.

नंदापूर हे जालना तालुक्यातील डोंगराळ भागातील एक छोटेसे गाव. या गावाची लोकसंख्या १८०० च्या जवळपास आहे. येथील गावकऱ्यांनी एकत्रित येऊन जलसंधारणात सहभाग घेण्याचा निर्णय घेतला. कृषीभूषण विजयअण्णा बोराडे तसेच कृषी विज्ञान केंद्र यांच्या मदतीतून बांध बंदिस्ती, गावातील नदीचे खोलीकरण आणि रूंदीकरण तसेच शेततळ्याच्या योजनेतून शेततळ्यांची उभारणी इ. कामे केल्याने यंदा नंदापूरला टँकरने पाणीपुरवठ्याची अजून तरी गरज भासलेली नाही. दुष्काळ तीव्र असल्याने गावातील विहिरींची पाणीपातळी मात्र खोलवर गेली असून, पुढील महिन्यात गावात टँकरने पाणी देण्याची वेळ येते की काय, इतकी पाणीपातळी घटली आहे. नंदापूर हे गाव उपक्रमशील असल्याने आ. अर्जुन खोतकर यांनी ते दत्तक घेतले आहे. त्यामुळे तेथे जास्तीचा निधी मिळाल्याने देखील हे गाव पाणीदार झाल्याचे सांगण्यात आले. 

जलसंधारणासाठी गावकऱ्यांची एकजुट
या शिवारात सध्या ६५० एकरवर द्राक्ष, ५० एकरवर सीताफळ, ५० एकरवर डाळिंब बागा फुललेल्या आहेत. कडवंचीनंतर या गावाने देखील उत्पादनात आघाडी घेऊन एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पूर्वी खडकाळ असलेल्या या माळरानावर या बागा फुलल्या, त्या केवळ शासनाच्या योजनांमुळेच नाही तर गावकऱ्यांनी एकजूट करून जलसंधारणाला जे महत्त्व दिले; त्यामुळेच हे शक्य झाल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्रातील कृषी अभियंता पंडित वासरे यांनी दिली. 

आणखी बरीच कामे करणार
जलसंधारणाची आणखी कामे करावयाची आहेत. कडवंची पॅटर्न येथे आणावयाचा आहे. कडवंची येथे कल्याणी नदी आहे. त्याचीच उपनदी नंदापूर येथून वाहते. ती नदी आणखी खोल करून त्यातील गाळ काढण्याचे कामही हाती घेण्यात येणार आहे. एकूणच बहुतांश गावांमध्ये टँकर सुरू आहेत. मात्र केवळ कडवंची, नंदापूर तसेच अन्य ज्या गावांनी जलसंधारण तसेच शेततळी बांधली आहेत, ती मात्र याला अपवाद आहेत. -दत्तात्रय चव्हाण, सरपंच, नंदापूर 

Web Title: 250 agriculture lake's Nandapur village is free of water tanker at Jalana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.