संचारबंदीच्या काळात 25 हजार पॉझिटिव्ह; 15 दिवसांनंतरही रुग्ण कमी होईनात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:49 AM2021-05-05T04:49:11+5:302021-05-05T04:49:11+5:30
जिल्ह्यात फेब्रवारी महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट आणखी वेगाने पसरली. ज्यावेळी ग्रामीणमध्ये कमी रुग्ण होते, त्यावेळी जालना शहर हे कोरोनाचे ...
जिल्ह्यात फेब्रवारी महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट आणखी वेगाने पसरली. ज्यावेळी ग्रामीणमध्ये कमी रुग्ण होते, त्यावेळी जालना शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले होते; परंतु आता जालन्यासह ग्रामीण भागातही कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरले आहेत. शहरातून गावाकडे येणाऱ्यांची संख्या वाढताच कोरोनाचा आलेख वाढला आहे. मध्यंतरी कोरोनाच्या चाचण्या वाढल्या असून, त्याचाही परिणाम रुग्ण वाढीवर झाला, परंतु चाचण्या वाढल्याने बरेच छुपे रुग्ण समोर आल्याने कोरोनाचा पाहिजे तेवढा फैलाव रोखण्यास मदत झाली आहे. आज हे रुग्ण निदान उपचार करत असून, यामुळे स्प्रेड होण्याचे प्रमाण काही अंशी का होईना कमी झाले आहे. एकीकडे संचारबंदी असताना दुसरीकडे शेती, बँक तसेच अन्य वित्तीय संस्था सुरूच आहेत. कुठलेही कारण पुढे करून नागरिक घराबाहेर पडत असल्याने प्रशासनही हतबल झाले आहे. हे निर्बंध आणखी कडक झाल्यास परिणाम होऊ शकतो.
या तीन कारणांमुळे रुग्णसंख्या वाढली
गर्दी न करणे तसेच सुरक्षित अंतर न पाळल्याने जालन्यात कोरोनाची वाढ कायम आहे. वारंवार सांगूही नागरिक नियमांचे पालन करत नसल्याचे वास्तव समोर येत आहे.
प्रवासावर असलेली बंदी ही कुचकामी ठरत आहे. अनेक जण मुंबई, पुणे अशा महानगरांमधून ग्रामीण भागात येत आहेत. त्यांची चाचणी होत नसल्याने फैलाव वाढला आहे.
शहरी भागात लसीकरण करण्यासाठी नागरिक स्वत:हून पुढे येत आहेत. असे असतानाच ग्रामीण भागात मात्र, लसीकरणासाठी ग्रामस्थांना विनवण्या करण्याची वेळ आली आहे. गैरसमजातून ग्रामीणमध्ये लसीकरणाचा वेग पाहिजे तेवढा नसल्याने स्थिती बिघडत आहे.
ग्रामीण भागांत रुग्ण वाढले, कारण?
ग्रामीण भागात रुग्ण वाढीचे कारण म्हणजेच मास्क न वापरणे, सॅनिटायझरला नाकारण्यासह कोरोना हा आजारच नाही, असा गैरसमज करून घेण्याचे प्रमाण जास्त आहे.
अनेक जण ताप, थंडी, सर्दी असल्यानंतरही त्यासाठी दवाखान्यात न जाता तो आजार अंगावरच काढला जात आहे. तसेच चाचणीसाठी स्वॅब घेताना जो प्लास्टिकचा चमचा नाक आणि घशात घालून स्वॅब घेतला जातो त्यांचीही भीती आहे.