२६ लाखांच्या जुन्या नोटा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:58 PM2018-01-29T23:58:24+5:302018-01-29T23:58:42+5:30
चलनातून बाद झालेल्या हजार व पाचशे रुपयांच्या २६ लाख ४५ हजार रुपयांच्या जुन्या नोटा किनगावराजा (जि.बुलडाणा) पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
देऊळगाव राजा : चलनातून बाद झालेल्या हजार व पाचशे रुपयांच्या २६ लाख ४५ हजार रुपयांच्या जुन्या नोटा किनगावराजा (जि.बुलडाणा) पोलिसांनी जप्त केल्या आहेत. प्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.
पोलीस सूत्रांनी सांगितले, की रविवारी रात्री किनगावराजा पोलीस ठाणे हद्दीत रात्रीची गस्त सुरू असताना, बुलडाणा येथील नियंत्रण कक्षातून नाकाबंदी करण्याबाबत संदेश प्राप्त झाला. वाशिम येथून काही जण चोरी करून एका कारने मेहकर-सिंदखेडराजा रस्त्याकडे येत असून किनगाव येथील राज्य मार्गावर नाकाबंदी करण्याचे आदेश पोलिसांना मिळाले. त्यानुसार किनगाव ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किशोर शेरकी यांनी कर्मचा-यांसह दुसरबीड टोल नाक्यावर मध्यरात्री दोन वाजता नाकाबंदी सुरू केली. सिंदखेडराजाकडून आलेली संशयित कार (एमएच-२८,एएन २१९५) पोलिसांना दिसली. पोलिसांनी कार थांबवून चालकाकडे चौकशी केली असता, तो घाबरत बोलू लागला. त्यामुळे संशय आल्याने पोलिसांनी कारची झडती घेतली. मागील बाजूस वायरच्या पिशवीमध्ये हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या २६ लाख ४५ हजारांच्या नोटा आढळून आल्या. पोलिसांनी कारसह नोटा जप्त करून सादिक खान मोहंमद अलीखान (रा.नांदुरा), पार्थ अविनाश लोंढे (अकोला), मुकेश गोकुळ पाटील (खामगाव), मो. साबीर शेख युसूफ, प्रशांत भुजंगराव निंबाळकर (नांदुरा) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी नोटा कोठून आणल्या, कुठे नेणार याबाबत समाधानकारक माहिती न दिल्यामुळे त्यांच्यावर किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.