२७ भरारी पथके तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 12:35 AM2019-04-01T00:35:39+5:302019-04-01T00:35:59+5:30
जालना लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडून जोरदार तयारी सुरु आहे. उमेदवार, कार्यकर्त्यांकडून गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी संपूर्ण मतदारसंघात भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत
दीपक ढोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडून जोरदार तयारी सुरु आहे. उमेदवार, कार्यकर्त्यांकडून गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी संपूर्ण मतदारसंघात भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. त्यांच्याकडून वेगवेगळ््या भागात नियमित गस्त सुरु झाली आहे. दरम्यान, भरारी पथकाकडूनही काही चुका, गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी त्यांच्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार आहे. सातत्याने याद्वारे पथकांवरही नजर ठेवली जाणार आहे.
जालना लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाने विधानसभा मतदारसंघनिहाय टप्पे केले आहेत. या सर्वच क्षेत्रात करडी नजर ठेवली जात आहे. कोठेही गैरप्रकार घडून नयेत, घडत असल्यास तातडीने संबंधित ठिकाणी पोहोचता यावे, यासाठी तब्बल २७ भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांचे काम सुरु झाले आहे. वेगवेगळ््या मार्गावर ही पथके गस्त घालत आहेत. दरम्यान, या पथकांकडूनही काही चुका, गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी त्यांना पुरविण्यात आलेल्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती उपनिवडणूक अधिकारी राजीव नंदकर यांनी दिले. या यंत्रणेद्वारे निवडणूक आयोगाचे अधिकारी आपल्या मोबाईलवरुन या वाहनांवर नजर ठेवणार आहेत. पथकाचे लोकेशन, त्यांचा धावता प्रवास या सगळ््या बाबी मोबाईवरुन ट्रेस करण्यात येणार आहे.
प्रत्येक घटनेचे चित्रीकरण होणार असून, यासाठी १५ पथकांकडे व्हिडीओ कॅमेरे देण्यात आले असून, २७ कॅमेरे या पथकाकडे असणार आहे. प्रत्येक घटना हे पथक कॅमेऱ्यात कैद करणार आहेत.