रोहयोच्या कामावर २७ हजार मजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 01:03 AM2019-06-03T01:03:55+5:302019-06-03T01:04:21+5:30
रोजगार हमी योजनेच्या कामांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, मागेल त्याला काम देण्यासाठी रोजगार हमी विभागाने प्रत्येक गावाचे नियोजन केले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी दिली
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दुष्काळाने हैराण असलेल्या ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेच्या कामांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, मागेल त्याला काम देण्यासाठी रोजगार हमी विभागाने प्रत्येक गावाचे नियोजन केले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी दिली. त्यांच्या विशेष प्रयत्नामुळे जालना जिल्ह्यात आठ हजार मजूरांची उपस्थिती आता थेट २७ हजारावर पोहचली आहे.
रोजगार हमी योजनेच्या कामावर आता २०० रूपये रोज मिळतो. जेवढे जास्त ब्रास काम होईल तेवढी मजूरी दिली जात आहे. त्यातच ही मजूरी त्यांना दर आठवड्याला त्यांच्या खात्यात रोखीने जमा केली जात आहे. जिल्ह्यातील बहुतांश मजुरांचे जॉबकार्ड काढले आहेत. त्यामुळे मस्टरवर कामांची तसेच मजूर उपस्थितीची नीट नोंद असल्यास मजुरीसाठी कुठलीच अडचण येत नाही. जालना जिल्ह्यातील वन, कृषी तसेच सामाजिक वनिकरणसह अन्य विभागांमध्ये ही रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत.
अनेक गावांमध्ये पाझर तलाव, फळबागेची लागवड, रोपवाटीका तयार करणे, तसेच आहेत त्या रोपवाटीकेतील झाडांची काळजी घेणे आदी कामे केली जात आहेत. या कामांसाठी मजुरांकडून मागणी होती, ती कामे त्यांना दिली असल्याचे सांगण्यात आले. काम नाही, म्हणून कोणाला स्थलांतर करण्याची वेळ यामुळे येणार नसल्याची काळजी घेतली असल्याचे वायाळ म्हणाले.
अचानक भेटी देऊन पाहणी
जिल्ह्यात सुरू असलेल्या जवळपास साडेतीनशे कामांवर मजुरांची काळजी घेतली जाते की, नाही याची पाहणी अचानक करण्यात येत आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने मजूरांना कामे करण्यासाठी अडचण येत आहे.
सकाळीच कामांना प्रारंभ केला जात आहे. अभियंत्याकडून मजुरांनी कोणते काम करावे याचे नियोजन सकाळीच ठरवून दिले जाते. त्यानंतर सायंकाळी चार वाजता ते काम निकषानुसार होते की, हे तपासल्यावर मस्टर भरल्या जाते.