२८ बैलांसह २ टेम्पो पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 01:05 AM2019-09-26T01:05:43+5:302019-09-26T01:06:31+5:30
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ बैलांसह दोन टेम्पो उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने ताब्यात घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ बैलांसह दोन टेम्पो उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी मध्यरात्री भोकरदन शहरातील शिवाजी चौकात करण्यात आली. कारवाईत १५ लाख ६० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे भोकरदन शहरातील शिवाजी चौकात पोलीस पथक नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करीत आहेत. मंगळवारी मध्यरात्री सिल्लोडकडून आलेले दोन टेम्पो (क्र. एम. एच. १९- झेड. ४९४५, एम. एच. २१- एक्स. १७१७) उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये, कर्मचारी अब्दुल आसेफ, शेख, रामेश्वर सिंनकर, गणेश पायघन, गणेश पिंपळकर, लक्ष्मण वाघ यांच्या पथकाने थांबविले. त्यावेळी एक चालक पळून गेला. तर एका चालकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन दोन्ही वाहनांची तपासणी केली. त्यावेळी वाहनांमध्ये पांढ-या, काळ्या, लाल रंगाचे २८ बैल आढळून आले.
भोकरदन शहरातील सिल्लोड येथील गोशाळेत पाठविण्यात आली. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चालक कोठडीत
पोलिसांनी अटक केलेला वाहन चालक राजू बेनाडे याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.