२८६ कोटींचा आराखडा मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:19 AM2019-06-15T00:19:13+5:302019-06-15T00:19:55+5:30
जालना जिल्ह्यासाठी विशेष बाब म्हणून फेब्रवारीत झालेल्या वित्त मंत्र्यांच्या बैठकीत या आराखड्यात ३६ कोटी १० लाख रूपयांची वाढ करून घेतल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.
जालना : जालना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आगामी वर्षासाठीच्या जवळपास २८६ कोटी रूपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली. जालना जिल्ह्यासाठी विशेष बाब म्हणून फेब्रवारीत झालेल्या वित्त मंत्र्यांच्या बैठकीत या आराखड्यात ३६ कोटी १० लाख रूपयांची वाढ करून घेतल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.
शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत जालना जिल्ह्यातील दुष्काळाचा मुद्दाही चांगलाच गाजला. उपस्थित सदस्यांनी दुष्काळाबाबत प्रशासन हलत नसल्याच्या तक्रारी केल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आली. पाणीटंचाई वीजेचा प्रश्न, पीकविमा आणि अन्य विकास कामांच्या मुद्यावरून उपस्थित सदस्यांनी आपले मुद्दे समिती समोर मांडले. याला संबंधित अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली, मात्र, त्या उत्तरांवर पदाधिकाऱ्यांचे समाधान झाले नसल्याचे दिसून आले.
एकूणच प्रशासनाने कारभार सुधारावा अशा स्पष्ट सूचना केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्या.
यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी देखील जिल्ह्यातील दुष्काळावर आक्रमक भूमिका मांडली. आ. राजेश टोपे यांनी वीजेचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगून वादळी वाºयांमुळे जे विद्युत खांब कोसळे आहेत, ते पुन्हा उभे करताना आठ-आठ दिवस लागत असल्याने अनेक गावे अंधारात असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. पिकविम्याचा मुद्दाही त्यांनी प्रभावीपणे मांडला.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश टोपे यांनी जिल्हा परिषदेसाठी जो निधी दिला जातो, तो देतांना तांत्रिक अडचणी सांगून तो इतरत्र कसा वळवला असा सवाल करून प्रशासनाला धारेवर धरले. एकूणच विविध विकास कामांच्या मुद्यावरून ही बैठक वादळी ठरली.
बैठकीस नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, सुनीता दौंड, दमयंती सावंत, उषा तोडावत, प्रतिभा बंड, कुशीवर्ता जाधव, सुरेखा लहाने, वैजयंती प्रधान, मनिषा जंजाळ, प्रतिभा घनवट, अनिता राठोड, लिलाबाई लोखंडे, अंशीराम कंटुळे, कैलास चव्हाण, चंद्रकांत साबळे, सोपान पाडमुख, यादवराव राऊत, गणेश पवार, गणेश फुके, संतोष अन्नदाते, आमेरखान एकबालखान आदींची उपस्थिती होती. यावेळी सदस्यांनीही त्यांच्या भागातील प्रश्न बैठकीत मांडले.