...तर तीन ग्रा.पं. टाकणार निवडणुकांवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 01:06 AM2018-05-04T01:06:50+5:302018-05-04T01:06:50+5:30
मुंबई - नागपूर समृध्दी महामार्गात प्रस्तावित करण्यात आलेला इंटरचेंज पॉईंट स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, हा इंटरचेंज पॉईंट बदलल्यास आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा गुंडेवाडी, जामवाडी, तांदूळवाडी येथील ग्रामस्थांनी दिला
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मुंबई - नागपूर समृध्दी महामार्गात प्रस्तावित करण्यात आलेला इंटरचेंज पॉईंट स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, हा इंटरचेंज पॉईंट बदलल्यास आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा गुंडेवाडी, जामवाडी, तांदूळवाडी येथील ग्रामस्थांनी दिला असुन याबाबत ग्रामसभांचे ठरावही घेतले आहेत. यासंदर्भात गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
नागपूर - मुंबई समृध्दी महामार्गावरील जामवाडी, तांदूळवाडी, गुंडेवाडी शिवारात चढ - उतार स्थळ (इंटरचेंज पॉईंट) निश्चित करण्यात आले होते. या संदर्भात उपविभागीय अधिका-यांनी दोन वेळेस अधिसूचना प्रसिध्द केली होती. त्यानुसार जामवाडी शिवारातील १.९७ हे., गुंडेवाडी शिवारातील ६५.८० हे. तांदूळवाडी शिवारातील ६.९८ हे. व जालना शिवारातील ६.७३ हे. जमीन अधिसूचित करण्यात आली होती. मात्र, असे असताना काही मोजक्या लोकांच्या दबावामुळे हा इंटरचेंज पॉर्इंट शेलगाव परिसरात नेण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्या विरोधात हे ठराव घेण्यात आले आहेत.
या निवेदनावर नारायण गजर, भरत कापसे, संतोष राजकर, बबन गजर, रामेश्वर वाढेकर, प्रशांत वाढेकर, भास्कर वाढेकर, भाऊसाहेब वाढेकर, आदींच्या स्वाक्ष-या आहेत.