७ लाखांचा सॅनिटायझर, मास्कचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 12:15 AM2020-03-20T00:15:26+5:302020-03-20T00:17:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : येथील जुना मोंढा परिसरातील कल्पना एम्पोरियम या घाऊक विक्रेत्याच्या गोदामावर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार गुरूवारी सायंकाळी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील जुना मोंढा परिसरातील कल्पना एम्पोरियम या घाऊक विक्रेत्याच्या गोदामावर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार गुरूवारी सायंकाळी अचानक छापा टाकण्यात आला. या छाप्यात सॅनिटायझर आणि मास्कचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून, त्याची अंदाजित किंमत सात लाख रूपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात आले. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही वस्तुंचा अतिरिक्त साठा करू नये अशा सूचना यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. त्याचे सर्रास उल्लंघन केल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
शहरातील औषधी दुकाने तसेच घाऊक विक्रेत्यांकडे मास्क आणि सॅनिटायझरचा साठा असल्याची टीप जिल्हा प्रशासनाला मिळाली. त्यानुसार ही माहिती तातडीने जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना देण्यात आली. त्यांनी लगेचच जिल्हा पुरवठा अधिकारी रीना बसैय्ये, औषधी प्रशासनाच्या अधिकारी अंजली मिटकर, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, सदरबाजार पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय देशमुख तसेच जीएसटी विभागाचे उपायुक्त श्रीवास्तव आदींनी ही कारवाई केली.
प्रारंभी संबंधित दुकान चालकाकडे जिल्हा पुरवठा अधिकारी आणि औषधी विभागाच्या अधिका-यांनी जाऊन चौकशी करून दुकानातील साठा दाखविण्याची मागणी केली. परंतु आमच्याकडे तसा साठा नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी दोन्ही महिला अधिका-यांना व्यापारी दाद नसल्याचे दिसून आल्यावर तातडीने पोलिसांना पाचरण करण्यात आले. पोलीस येताच दुकानाच्या तळमजल्यावर असलेल्या गोदामाचे शटर उघडल्यावर हा साठा अधिका-यांच्या निर्दशनास आल्याचे सांगण्यात आले.
उत्पादन : मेड इन तुर्कीने चक्रावले अधिकारी
गुरूवारी केलेल्या कारवाईत जवळपास सॅनिटाझरच्या ७३० बॉटल्स आणि १९ हजार मास्क आढळून आले. ज्यांची किंमत ही सात लाख रूपयांपेक्षा अधिक होते. हा साठा जप्त केल्यानंतर त्याची बारकाईने तपासणी केली असता, हे सॅनिटायझरवर मेड इन तुर्कीतील असल्याची छपाई दिसून आली. या संदर्भात दुकान मालक बंब यांना विचारले असता, त्यांना याचा खुलासा करता आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकूणच हे सॅनिटायझर बनावट असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्याचे सँपल घेऊन ते शुक्रवारी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येतील अशी माहिती सूत्रांनी दिली.