३११ अंगणवाड्यांना मिळणार नवीन इमारती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 12:35 AM2019-12-02T00:35:07+5:302019-12-02T00:35:35+5:30
स्वत:ची इमारत नसलेल्या अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीमधून ५ कोटी ५६ लाख व अखर्चिंत निधीतून १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : स्वत:ची इमारत नसलेल्या अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीमधून ५ कोटी ५६ लाख व अखर्चिंत निधीतून १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून ३११ अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी संगीता लोंढे यांनी दिली.
जिल्ह्यात १९४६ अंगणवाड्या आहे. यापैकी ३६८ अंगणवाड्यांना स्वमालकीची इमारत नसल्यामुळे त्या समाजमंदिर, मंदिर, खासगी इमारतीत व जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारतीमध्ये भरत आहेत तर इतर अंगणवाड्यांनाही दुरूस्तीची गरज आहे. त्यामुळे नवीन अंगणवाड्या बांधकामासाठी व अंगणवाड्यांच्या दुरूस्तीसाठी अनेकवेळा निधीची मागणी करण्यात येत होती. परंतु, प्रशासनातर्फे निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही.
अंगणवाड्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी मिळण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडून पाठपुरावा सुरू होता. प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर केला होता. जिल्हा नियोजन समितीने या प्रस्तावाला मंजूरी दिली असून, ४४ अंगणवाड्या बांधण्यासाठी ५ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यातील ५० टक्के निधी हा अंगणवाड्यांच्या दुरूस्तीसाठी खर्च करण्यात येईल. तर जिल्हा परिषदेच्या अखर्चींत निधीमधून २६७ अंगणवाड्यांसाठी १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या अंगणवाड्यांच्या बांधकामास लवकरच सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी संगीता लोंढे यांनी दिली. दरम्यान, अंगणवाड्यांना स्वत:च्या मालकीच्या इमारती नव्हत्या. त्यामुळे त्यांना भेडसावणारी ही समस्या विचारात घेऊन हा निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे ३११ अंगणवाड्या स्वमालकीच्या इमारतीत भरू शकतील.
८८ अंगणवाड्यांसाठी ९ कोटींचा प्रस्ताव
मानव विकास मिशनमधून विविध घटकांसाठी निधी दिला जातो. २०१९-२० या आर्थिक वर्षांसाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यातून ८८ अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी ९ कोटी रुपयांचा निधीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. हा प्रस्ताव मंजूर झाल्यावर ८८ अंगणवाड्यांचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.