दारूविक्रेत्यांविरूध्द १०० गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:33 AM2019-10-16T00:33:32+5:302019-10-16T00:33:57+5:30
चालू महिन्यात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईनंतर अवैध दारूविक्री करणाऱ्यांविरूध्द १०० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने गांधी सप्ताह व आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर धडक कारवाई मोहीम राबविण्यात आली आहे. चालू महिन्यात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईनंतर अवैध दारूविक्री करणाऱ्यांविरूध्द १०० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर तब्बल ६ लाख ७२ हजार ६६२ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त पी. एच. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक भाग्यश्री जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई मोहीम राबविली. अवैध मद्य विक्री व हातभट्टी निर्मिती केंद्रावर धाडी टाकून १०० गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
यात ७१ वारस व २९ बेवारस गुन्ह्यांचा समावेश आहे. गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे ९६२६ लिटर रसायन, ८२३ लिटर गावठी दारू (हातभट्टी), ३९८.४८ लिटर देशी दारू, ३५.२ लिटर विदेशी दारू असा एकूण १०८८५.६८ लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान ७० आरोपींना अटक करण्यात आली असून सोबत ७ वाहने जप्त करण्यात आले आहेत.
कारवाईत एकूण एकूण ६ लाख ७२ हजार ६६२ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अवैध दारूविक्री : ५ दुकानांवर निलंबनाची कारवाई
नियमांचे उल्लंघन करून दारूची विक्री केल्याचा प्रकार पथकाच्या तपासणीत समोर आला आहे. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने पाच दुकानांवर ३० दिवसाच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
तीन दिवसांचा ‘ड्राय-डे’
जिल्हाधिका-यांच्या सूचनेनुसार १९ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते २१ आॅक्टोबर या कालावधीत व २४ आॅक्टोबर रोजी ‘ड्राय-डे’ पाळण्यात येणार आहे.
या कालावधीत अवैध दारूविक्री करणा-यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिला आहे.
वाहनांची तपासणी
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची विविध पथके वाहनांची तपासणी करीत आहेत. तसेच पार्सल सुविधा देणाºया विविध संशयितांवरही कारवाईची मोहीम राबविली जात आहे.