३६ गावांना महापुराची धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:36 AM2019-08-12T00:36:24+5:302019-08-12T00:37:25+5:30
अंबड, परतूर व घनसावंगी तालुक्यांमधील नदीकाठच्या ३६ गावांमधील नागरिकांना महापुराची धास्ती बसली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
घनसावंगी : नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहातून पाण्याचा विर्सग करण्यात आल्याने जायकवाडी धरणाच्या जलसाठ्याची १०० टक्क्यांकडे वाटचाल सुरू आहे. यामुळे अंबड, परतूर व घनसावंगी तालुक्यांमधील नदीकाठच्या ३६ गावांमधील नागरिकांना महापुराची धास्ती बसली आहे.
नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून येत्या एक दोन दिवसांमध्ये पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. मात्र, जायकवाडी धरणाचा जलसाठा ८१ टक्क्यांहून अधिक झाला आहे. यामुळे यापुढे नाशिक व अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाऊस पडताच धरण पूर्णक्षमतेने भरून गोदावरीला पूर येऊ शकतो, जालना जिल्ह्यात गोदावरी नदीचा ६० किलोमिटरचा किनारा लाभलेला असून सन २००६ मध्ये गोदावरी नदीला पूर आला होता.
यावेळी जालना जिल्ह्यातील ३६ गावांना पूराचा तडाखा बसला होता. यामध्ये घनसावंगीत तालुक्यातील १८ गावे अंबड तालुक्यातील १३ गावे व परतूर तालुक्यातील पाच गावांचा समावेश होता. यावेळी अनेकांचे संसार उद्धवस्त झाले होते. शेकडो एक्कर जमीन पाण्याखाली गेली होती. हीच परिस्थिती पुन्हा उद्भवत तर नाही ना असा प्रश्न आता ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.
२००६ मध्ये गोदावरीला आलेल्या पुराची पुनरावृत्ती पुन्हा होवू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने त्यावेळी काही गावांचे पूर्ण तर काही गावांचा अंशत: पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव तयार केला होता.
विशेष म्हणजे घनसावंगी तालुक्यातील काही गावांचा आराखडा तयार करण्यात आला होता. यात ३६३० कुटूंबांचा समावेश होता. या कुटूंबांना ४९६ हेक्टर ३७ गुंठे जमीन संपादित करण्यासाठी व नागरि सुविधांसाठी २००६ नुसार ७६४ कोटी साठ लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे.
यामध्ये अंबड तालुक्यातील गोंदी, कुरण, गंगा चिंचोली, साष्ट पिंपळगाव, बळेगाव, आपेगाव, शहागड, पाथरवाला, हसनापूर, कोठाळा, इंदलगाव, साडेगाव आदी गावे आहेत. घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी, रामसगाव, सौंदल गाव, लिंगेवाडी, गुंज बुद्रुक, रामसगाव, मुद्रेगाव, कोटी, शेवता, अंतरवाली टेंभी, बानेगाव, उक्कडगाव, शिवणगाव, बादली, राजाटाकळी, मंगरूळ, श्रीपत धामणगाव तर परतूर तालुक्यातील गोळेगाव, संकल्प पुरी, गंगा किनारा, चांगतपूरी, सावरगाव बुद्रुक आदी गावांचा समावेश आहे.