जालन्यात ३० किलो चांदी जप्त; पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 04:01 PM2020-09-12T16:01:20+5:302020-09-12T16:11:14+5:30
कारसह संबंधित चौघांना चंदनझिरा पोलीस ठाण्यात नेऊन कागदपत्रांची चौकशी केली जात आहे.
जालना : एका कारमध्ये नेण्यात येत असलेली ३० किलो चांदी दहशतवाद विरोधी पथक व चंदनझिरा पोलिसांनी जप्त केली. ही कारवाई शनिवारी सकाळी नागेवाडी टोलनाक्याजवळ (ता.जि. जालना) करण्यात आली. या कारवाईत तब्बल २६ लाख ८० हजार ३३६ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एका कारमध्ये मोठ्या प्रमाणात चांदीची वाहतूक सुरू असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथक व चंदनझिरा पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पथकाने शनिवारी सकाळी नागेवाडी टोलनाक्याजवळ सापळा लावला. त्यावेळी आलेल्या एका कारला (क्र. एम.एच.२०- ई.जे.६८९१) थांबविण्यात आले. कारची तपासणी केली असता डिक्कीमध्ये दोन पिशव्या आढळून आल्या. त्यात चांदीचे ३० किलो वजनाचे १५ गट्टू होते. पोलिसांनी कारमधील प्रवीण नंदलाल भोमा (रा. कुंभारवाडा औरंगपुरा, औरंगाबाद), कार चालक अस्लमखान मसुदखान (रा.बेगमपुरा औरंगाबाद), मनोज ओमप्रकाश वर्मा (रा. देवानगर औरंगाबाद), सय्यद फारूख सय्यद हमीदोदीन (रा. रहिमानियाँ कॉलनी, औरंगाबाद) या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील चांदी, कार असा २६ लाख ८० हजार ३३६ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वरील चौघाविरूध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार प्रमोद बोंडले हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गंदम, फौजदार प्रमोद बोंडले, दहशतवाद विरोधी पथकातील अंकुश राठोड, शेख रशीद, दिनेश बरडे, संजय गवळी, राजू घुगे, अभिजित अडीयाल, तौसिफ पठाण, अनिल काळे यांच्या पथकाने केली.
औरंगाबादहून नांदेडकडे वाहतूक
कारमध्ये सापडलेली ३० किलो चांदी ही औरंगाबादहून नांदेडकडे नेण्यात येत होती. संबंधित चौघांकडे कागदपत्रांसह इतर बाबींची विचारणा केल्यानंतर समाधानकारक उत्तरे पोलिसांना मिळालेली नाहीत. त्यामुळे त्या चौघांची कसून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.