भोकरदनचे ३३८ नागरिक अडकले परराज्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 12:26 AM2020-03-29T00:26:47+5:302020-03-29T00:27:52+5:30
भोकरदन तालुक्याचे ३३८ मजूर परराज्यात तर १ हजार १९९ मजूर हे परजिल्ह्यांत अडकले असल्याचे प्रशासनाने सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : परराज्यांतून व परजिल्ह्यांतून कामासाठी आलेल्या मजुरांना अन्नधान्य पुरवठा करण्याच्या दृष्टीने प्रशासनाच्यावतीने गावनिहाय मजुरांची गणना करण्यात येत आहे. त्यामध्ये परराज्यांतील १८३ तर परजिल्ह्यांतील २६९ मजूर हे भोकरदन तालुक्यात अडकले आहेत. भोकरदन तालुक्याचे ३३८ मजूर परराज्यात तर १ हजार १९९ मजूर हे परजिल्ह्यांत अडकले असल्याचे प्रशासनाने सांगितले.
जगात कोरोनाने दहशत निर्माण केल्यानंतर सरकारने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शहरासह ग्रामीण भागात जनजागृती केली जात आहे. शिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी संचारबंदी देखील लागू करण्यात आली. त्यामुळे अनेकजण परराज्यात तर काही जण परजिल्ह्यात अडकले आहेत. अशा नागरिकांना दररोजचा उदरनिर्वाह कसा करावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. अडकलेल्या मजुरांना अन्नधान्य देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. इतर राज्यात अडकलेल्या राज्यातील नागरिकांना मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संबंधित राज्य सरकारांशी चर्चा केली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी परराज्यात व परजिल्ह्यांत अडकलेल्या व आपल्या जिल्ह्यात अडकलेल्या मजुरांची गणना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार भोकरदन तालुक्यात परराज्यातील १८३ तर परजिल्ह्यांतील २६९ मजूर अडकले आहेत. तालुक्याचे ३३८ मजूर परराज्यांत तर १ हजार १९९ मजूर हे परजिल्ह्यांत अडकले असल्याची माहिती गटविकास अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अहवाल तात्काळ देण्याचे होते आदेश
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी मजुरांची गणना करून तात्काळ अहवाल देण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने अवाहल तयार करण्यात आला असून, तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. भोकरदन तालुक्यात १ फेब्रुवारी ते २६ मार्च यादरम्यान विविध आजार किंवा वृद्धापकाळाने १८५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये १०६ पुरुष तर ७९ महिलांचा समावेश आहे. २ ते २५ वयोगटातील २५, १७ ते ५० वयोगटातील १६५ जणांचा मृत्यू झाला असल्याचे तालुका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.