महाकाळा, किनगाव येथे ३४ कोंबड्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:28 AM2021-01-21T04:28:43+5:302021-01-21T04:28:43+5:30
जालना : अंबड तालुक्यातील महाकाळा येथील २० व किनगाव येथील १४ कोंबड्यांचा बुधवारी मृत्यू झाला. पशुवैद्यकीय विभागाच्या टीमने तत्काळ ...
जालना : अंबड तालुक्यातील महाकाळा येथील २० व किनगाव येथील १४ कोंबड्यांचा बुधवारी मृत्यू झाला. पशुवैद्यकीय विभागाच्या टीमने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन सॅम्पल तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठिवले. तर, रोषणगाव (ता. बदनापूर) येथील कोंबड्यांच्या मृत्यूचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.
बदनापूर तालुक्यातील रोषणगाव येथील २२ कोंबड्यांचा शनिवारी मृत्यू झाला होता. घटनेनंतर पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने या परिसरास भेट देऊन मयत कोंबड्यांचे सॅम्पल तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. हे सॅम्पल भोपाळ येथील प्रयोगशाळेेकडे पाठविण्यात आले असून, अहवाल अद्याप अप्राप्त आहे. रोषणगाव येथील अहवाल अद्याप अप्राप्त असताना अंबड तालुक्यातील किनगाव येथील १४ व महाकाळा येथील २० काेंबड्यांचा बुधवारी मृत्यू झाला आहे. घटनास्थळाला जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डी.एस. कांबळे, शिवाजी कुरेवाड यांनी पथकासह भेट दिली. दोन्ही ठिकाणचे सॅम्पल पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाकाळा व किनगाव येथील एक किलोमीटर त्रिज्येचा परिसर संपर्क भाग म्हणून घोषित करण्यात आला आहे.
मयत कोंबड्यांची माहिती द्यावी
एखाद्या ठिकाणी कोंबड्यांचा मृत्यू झाला, तर दक्षतेच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकरी, पशुपालक, पोल्ट्रीचालकांनी मयत कोंबड्यांची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या नियंत्रण कक्षाला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.
अशी घ्यावी दक्षता
एखादी कोंबडी किंवा पक्षी मृत आढळून आला, तर त्याच्या संपर्कात पक्षी, प्राणी येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. आजारी पक्ष्याचे विलगीकरण करावे व ते पक्षी इतर प्राण्यांच्या किंवा पक्ष्यांच्या संपर्कात येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. प्रत्येक कुक्कुटपालकाने जैवसुरक्षेबाबत खबरदारी घ्यावी. सतर्क क्षेत्रामध्ये जिवंत वा मृत पक्षी तसेच अंडी, कोंबडी खत पक्षी, खाद्य, अनुषंगिक साहित्य व उपकरणे इत्यादींची विक्री वा वाहतूक करू नये. सतर्क क्षेत्रातील पाच किलोमीटर त्रिज्येत प्रभावित पक्ष्यांच्या आजाराचे निदान अहवाल प्राप्त होईपर्यंत कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी विक्रीची किंमत किंवा कत्तलीची दुकाने, वाहतूक, पक्षी प्रदर्शने इत्यादी बाबी बंद राहणार आहे.