११ महिन्यांत ३५ खून, १० दरोडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:29 AM2020-12-29T04:29:11+5:302020-12-29T04:29:11+5:30
जालना : गत ११ महिन्यांत जिल्ह्यात ३५ जणांचा खून झाला असून, १० दरोडे पडले आहेत. तर तब्बल २६० घरफोड्या ...
जालना : गत ११ महिन्यांत जिल्ह्यात ३५ जणांचा खून झाला असून, १० दरोडे पडले आहेत. तर तब्बल २६० घरफोड्या झाल्या असून इतर चोरीच्या ७२३ घटनांची नोंद पोलीसदप्तरी झाली आहे. याशिवाय जबरी चोरीच्या ६९ घटना घडल्या आहेत.
चालू वर्षात कोरोनामुळे सर्वसामान्यांसमोर एक ना अनेक प्रश्न उभे आहेत. अतिवृष्टी, रोगराईमुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. त्यात चालू वर्षात दरोडेखोर, सराईत चोरट्यांसह भुरट्या चोऱ्या करणाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांची झोप उडविली आहे. एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असताना दुसरीकडे चोरट्यांनीही सर्वसामान्यांना लुटले आहे. जिल्ह्यात चालू वर्षातील ११ महिन्यांत दहा दरोड्याच्या घटना घडल्या असून, त्यातील सात घटनांचा उलगडा झाला आहे. जबरी चोरीच्या ६९ घटना घडल्या असून ३३ प्रकरणांचा उलगडा झाला आहे. आजवर २६० घरफोड्या झाल्या आहेत. यात दिवसा २८ तर रात्री २३२ घरफोड्या झाल्या आहेत. २६० पैकी ६४ प्रकरणांचा उलगडा झाला आहे. तर इतर चोरीच्या तब्बल ७२३ घटनांची नोंद जिल्ह्यातील पोलीसदप्तरी झाली आहे. त्यातील ३७६ प्रकरणांचा पोलिसांनी छडा लावला आहे.
गतवर्षी २०१९ मध्ये जिल्ह्यात खुनाच्या ३६ घटना घडल्या होत्या. तर यावर्षी ३५ घटना घडल्या आहेत. यात प्राणघातक हल्ला प्रकरणात ८९ गुन्हे दाखल दाखल झाले आहेत. एकूणच गतवर्षीपेक्षा चालू वर्षात चोऱ्यांच्या घटना अधिक घडल्या आहेत. त्यातील काही घटनांचा पोलिसांना उलगडा झाला आहे. इतर घटनांचा उलगडा झालेला नाही.
वाहनचाेरांची चांदी
जिल्ह्यात वाहनचोर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. गतवर्षी २०१९ मध्ये जिल्ह्यातून ३३० वाहने चोरीस गेली होती. तर चालू वर्षात ३८२ वाहने चोरीस गेले आहेत. विशेषत: दुचाकीचोरांनी शहरासह जिल्ह्यात उच्छाद मांडला आहे. काही पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीचोरांना जेरबंद करण्यात आले आहे. मात्र, दुचाकीचोरीचे प्रकार सुरूच आहेत.
चेन स्नॅचिंगला लगाम
गतवर्षी दुचाकीस्वार चोरट्यांनी जिल्ह्यात महिलांच्या गळ्यातील दागिने लूटल्याच्या १५ घटना घडल्या होत्या. पोलिसांनी चेन स्नॅचिंगच्या या घटनांना चालू वर्षात लगाम लावला आहे. तरीही आजवर चेन स्नॅचिंगचे आठ गुन्हे दाखल झालेले आहेत.
(कोट)
गुन्ह्यांचा तपास सुरू
दाखल गुन्ह्यांची पेंडंन्सी कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. दरोडे, घरफोड्यांसह इतर चोऱ्यांच्या घटनांचा उलगडा झाला आहे. शिवाय, दुचाकीचोरी प्रकरणातील आरोपीही जेरबंद करण्यात आले आहेत. चोऱ्यांच्या घटना थांबविण्यासाठी रात्रीची गस्त वाढविण्यात आली असून, विशेष पथकांमार्फत सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली जात आहे. कायदा- सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्हा पोलीस दल काम करीत आहे.
विनायक देशमुख
पोलीस अधीक्षक, जालना