सिझेरियनला फाटा देत ३५०० नैसर्गिक प्रसुती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:59 AM2019-01-18T00:59:06+5:302019-01-18T00:59:34+5:30
शासकीय महिला रुग्णालयात वर्षभरात ४ हजार ३६५ प्रसुतींपैकी केवळ ४२३ सिझेरियन प्रसुती करण्यात आल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आजकाल प्रसुती म्हटलं की, सिझेरियन असेच गणित झाले आहे. मात्र, शासकीय महिला रुग्णालयात वर्षभरात ४ हजार ३६५ प्रसुतींपैकी केवळ ४२३ सिझेरियन प्रसुती करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांसह अनेक खासगी दवाखाने आव्हानात्मक प्रसूती म्हणत महिलांना घाटीत रेफर करतात. त्यातूनही घाटीने सिझेरियनचे प्रमाण कमी करण्यात यश मिळविले आहे. शासकीय महिला रूग्णालयात वर्षभरात ३ हजार ९४२ महिलांची नैसर्गिक प्रसुती झाली आहे.
शहरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील सर्वात महत्वाचा समजला जाणारा विभाग म्हणजे प्रसूती विभाग. रुग्णालयात वर्षभरात ४ हजार ३६५ प्रसुती करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी ३ हजार ९४२ महिलांची नैसर्गिकरीत्या प्रसुती करण्यात आली, तर ४२३ महिलांची सिझेरियन प्रसुती करण्यात आली आहे.
प्रसुतीबाबत महिलेची केस गुंतागुंतीची असेल तरच प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये किंवा उपजिल्हा रुग्णालयातून त्यांना घाटीत पाठविले जाते. सर्वाधिक गुंतागुंतीच्या प्रसुतीच्या केसेस येत असूनही या वर्षात घाटीत सिझेरियन प्रसुतीचे प्रमाण कमीच आहे. याउलट चित्र खाजगी रुग्णालयांतील आहे. खासगी रुग्णालयांत मोठ्या प्रमाणावर सिझेरियन करून प्रसूती केली जाते. त्यात अनेकदा सिझेरियनची गरज होती का हे तपासणेही गरजेचे आहे, असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
मॉनिटिरिंग सिस्टीममुळे पोटात असलेल्या बाळाविषयी सगळ्या गोष्टी समजतात. त्यामुळे नॉर्मल प्रसुती सहज शक्य आहे. मात्र, अनेकदा नातेवाईकही बाळ व आई सुखरूप राहावे, म्हणून सिझेरियनची मागणी करतात.
त्यामुळे हे प्रमाण वाढत आहे. मुख्यत्वेकरून गुंतागुंतीची केस असेल तरच सिझेरियन व्हावे. वर्षभरात झालेल्या सिझेरियनचे आॅडिट घाटीत केले जाते. त्यामुळे सिझेरियन झालेली प्रसुती खरेच करणे गरजेचे होते का? तसेच पुन्हा तशीच परिस्थिती आल्यास सिझेरियन कसे टाळता येईल यावर उपाय शोधले जातात, अशी माहिती शासकीय महिला रुग्णालयाचे शल्यचिकित्सक राजेंद्र पाटील यांनी दिली.
दरम्यान, मराठवाड्यात जालना जिल्हा नैसर्गिक प्रसुतीमध्ये प्रथम आहे.
सिझेरियनची कारणे
बाळाचे डोके मोठे आहे. मूल आडवे किंवा पायाळू असल्यास, आईचा रक्तदाब वाढला, मधुमेह असेल, गर्भाशयाच्या तोंडावर गाठ आहे. किंवा नाळ बाळाच्या मानेभोवती किंवा खाली सरकलेली असल्यास प्रसूतीत अडचण येते. त्यासाठी सिझेरियन करावे लागते. पोट व गर्भाशयास छेद घेऊन सिझेरियन प्रसुती केली जाते.
कीचकट शस्त्रक्रियांत यश
स्त्रीरोग विभागात विविध प्रकारच्या अवघड व कीचकट शस्त्रक्रिया करण्यातही डॉक्टरांना यश आले. महिलांच्या पोटातील विविध आकारांच्या व वजनाच्या गोळ्यांच्या शस्त्रक्रियांचा त्यात समावेश आहे.