जालना शहरात आजपासून ३५ वे अस्मितादर्श साहित्य संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:28 AM2018-10-27T00:28:38+5:302018-10-27T00:29:02+5:30
जालना शहरात आयोजित ३५ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे उदघाटन शनिवारी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष तथा प्रख्यात विचारवंत डॉ. सुखदेव थोरात यांच्या हस्ते होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनादरम्यान परिसंवाद, लेखक, वाचक व संवाद, कविसंमेलन, कथाकथन आदीं कार्यक्रम-उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ.संजय लाखे पाटील यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहरात आयोजित ३५ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे उदघाटन शनिवारी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष तथा प्रख्यात विचारवंत डॉ. सुखदेव थोरात यांच्या हस्ते होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनादरम्यान परिसंवाद, लेखक, वाचक व संवाद, कविसंमेलन, कथाकथन आदीं कार्यक्रम-उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ.संजय लाखे पाटील यांनी दिली.
याबाबात अधिक माहिती देतांना डॉ.लाखे पाटील पुढे म्हणाले की, जालना शहरातील मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात हे अस्मितादर्श साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. या साहित्य संमेलनस्थळाला पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे सभागृह असे नाव देण्यात आले आहे.
शनिवार, या साहित्य संमेलनास संविधान रॅलीने सुरुवात होणार आहे. ही संविधान रॅलीस सकाळी ८ वाजता मस्तगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून प्रारंभ होणार असून, संमेलनस्थळी तिचा समारोप होणार आहे.
सकाळी ९ वाजता डॉ.सुखदेव थोरात यांच्या हस्ते अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे उदघाटन होणार आहे. यावेळी महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मागासवर्गीय विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, प्रसिध्द कवी प्रा. फ. मु. शिंदे, जालना शहराच्या नगराध्यक्षा संगीताताई गोरंट्याल, जालना नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष राजेश राऊत आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या उदघाटन सोहळ्यात स्मरणिका व ग्रंथ प्रकाशनासह पुरस्काराचे वितरणही मान्यवर अतिथींच्या हस्ते होणार आहे.
दुपारी १ ते ३.३० दरम्यान पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे बहुआयामी सांस्कृतिक व्यक्तिमत्व या विषयावर डॉ. चिंतामण कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात डॉ. मिलिंद बागुल, सुरेश साबळे, डॉ. वासुदेव मुलाटे, शत्रुघ्न जाधव, डॉ. इसादास भडके, डॉ. सुशिला मुल-जाधव, प्रेमानंद गज्वी, डॉ. केशव देशमुख, डॉ. संपतराव गायकवाड, निलकांत चव्हाण, विश्वास वसेकर, वसंत शेंडे आदी मान्यवर वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत.
यावेळी अॅड. बी. एम. साळवे, सुभाष देविदान व डॉ. संजय राख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दुपारी ३.३. 0ते सायं. ५.३० दरम्यान भारतीय संविधान आणि वर्तमान संदर्भ या विषयावर प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात डॉ. रा. का. क्षीरसागर, डॉ. निलकंठ शेरे, डॉ. अनंत राऊत, डॉ. श्रीराम निकम, प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, डॉ. वसंत डोंगरे, महेंद्र ताजणे, डॉ. प्रविण मोरे, डॉ. मा. प. थोरात, दीपकराज कापडे आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. यावेळी अॅड. ब्रम्हानंद चव्हाण, डॉ. नारायण मुंढे, जयेश बाविसी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे लाखे पाटील यांनी सांगितले.