३६५ गावांची टँकरवर मदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 12:32 AM2019-04-17T00:32:38+5:302019-04-17T00:33:22+5:30
वाढत्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील ३६५ गावे आणि ७३ वाड्यांसाठी तब्बल ४२२ टँकरला मंजुरी दिली
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेबरोबरच पाण्याची टंचाईही वाढू लागली आहे़ वाढत्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील ३६५ गावे आणि ७३ वाड्यांसाठी तब्बल ४२२ टँकरला मंजुरी दिली आहे़ तर ५८० विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे़
पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असून, शहरी भागातील नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे़ टंचाई निवारणार्थ ग्रामपंचायत स्तरावरून येणाऱ्या प्रस्तावांना प्रशासनाकडून मंजुरी देण्यात येत आहे़
सध्या जिल्ह्यातील ३६५ गावे आणि ७३ वाड्यांसाठी ४२२ टँकरना मंजुरी देण्यात आली आहे़ यात जालना तालुक्यातील २७ गावांसाठी ५० टँकर, बदनापूर तालुक्यातील ५२ गावांसाठी ६१ टँकर, भोकरदन तालुक्यातील ८१ गावांसाठी ९२ टँकर, जाफराबाद तालुक्यातील ५३ गावांसाठी ५७ टँकर, परतूर तालुक्यातील १८ गावांसाठी १८ टँकर, मंठा तालुक्यातील ३१ गावांसाठी ३२ टँकर, घनसावंगी तालुक्यातील ४४ गावांसाठी ४४ टँकर तर अंबड तालुक्यातील ५९ गावांसाठी ६६ टँकर सुरू करण्यात आले आहेत़. टँकरची संख्या भविष्यात सातशेपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.
भोकरदन तालुक्यात सर्वाधिक टँकर
भोकरदन तालुक्यात सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. भोकरदन तालुक्यात ९२, जालना ५०, बदनापूर ६१, जाफराबाद ५७, परतूर १८, मंठा ३१, अंबड ६६, घनसावंगी तालुक्यात ४४ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
नियोजन सुरू- गोरंट्याल
घाणेवाडी तलाव आटल्याने पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिकांनी कुठल्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये. जायकवाडी धरणातून जास्तीचे पाणी पुरविण्याचे नियोजन सुरू असल्याचे नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी सांगितले.