१३६५ शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज होणार माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 01:01 AM2019-09-19T01:01:10+5:302019-09-19T01:01:44+5:30

जिल्ह्यातील ८५ सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेरील १३६५ शेतक-यांना दिलेले १ कोटी ५० लाख ८२ हजार रूपयांचे कर्ज माफ होणार आहे.

4 farmers will be exempt from mortgage loan | १३६५ शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज होणार माफ

१३६५ शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज होणार माफ

googlenewsNext

विजय मुंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शासनाच्या सावकारकी कर्जमाफी योजनेतून सावकाराच्या परवाना कार्यक्षेत्राच्या बाहेरील शेतकरी वंचित राहिले होते. मात्र, नुकताच शासनाने कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना कर्ज देणा-या सावकारांकडील कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ८५ सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेरील १३६५ शेतक-यांना दिलेले १ कोटी ५० लाख ८२ हजार रूपयांचे कर्ज माफ होणार आहे.
सततच्या दुष्काळामुळे शेतक-यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे खरीप, रबी हंगाम शेतक-यांच्या हातून जात असून, केलेला खर्चही निघत नाही. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, शेती मशागत यासह इतर कामांसाठी शेतकरी कर्ज मिळावे म्हणून बँकेच्या पाय-या झिजवितात. बँका कर्ज देत नसल्याने अनेकांना सावकारांकडून कर्ज घेतल्याशिवाय गत्यंतर राहत नाही. सावकार कर्ज देत असले तरी भरमसाठ व्याज लावून शेतक-यांची आर्थिक पिळवणूक करतात. शेतक-यांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने नियम-अटी घालून अनेकांना सावकारकी करण्याची परवानगी दिली. सततच्या दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आल्याने शासनाने २०१५ मध्ये सावकारांकडील कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जालना जिल्ह्यातील ४० सावकारांनी १२४३ शेतक-यांना दिलेले १ कोटी ३७ लाख रूपयांचे कर्ज माफ झाले होते.
मात्र, शासनाच्या या कर्जमाफी योजनेत परवाना कार्यक्षेत्राच्या बाहेरील ज्या शेतकºयांना कर्जाचे वाटप झाले ते कर्ज माफ करण्यात आले नव्हते. हे कर्जही माफ व्हावे, यासाठी शासनस्तरावर मागणी करण्यात आली. न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यंदाही पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेरील शेतक-यांना वाटप केलेले कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. यात जालना जिल्ह्यातील ७६ सावकारांनी तालुका कार्यक्षेत्राबाहेरील १३२३ शेतक-यांना १ कोटी ४६ लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. तर ९ सावकारांनी जिल्ह्याच्या बाहेरील ४२ शेतक-यांना ४ लाख ३७ हजार रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. असे एकूण १३६५ शेतक-यांचे ८५ सावकारांकडील १ कोटी ५० लाख ८२ हजार रूपयांचे कर्ज माफ होणार आहे. शासन निर्देशानुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली आहे.
जालना जिल्ह्यात सद्यस्थितीत ११० परवानाधारक सावकार आहेत. यात जालना तालुक्यात ७०, बदनापूर ८, अंबड ३, घनसावंगी ९, परतूर ८, मंठा ४, जाफराबाद ६ तर भोकरदन तालुक्यात २ परवानाधारक सावकार असल्याची नोंद जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आहे.
परवाना नूतनीकरण करण्यासाठीही सावकारांची उपनिबंधक कार्यालयात सतत वर्दळ असते. तर काही जण नवीन प्रस्तावही दाखल करीत आहेत.

Web Title: 4 farmers will be exempt from mortgage loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.