अस्तित्वात नसलेल्या योजनेसाठी ४ हजार अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:31 AM2019-02-16T00:31:55+5:302019-02-16T00:32:20+5:30
सरकारने मुलींचा जन्मदार वाढविण्यासाठी देशात ‘बेटी बचाव - बेटी पढाव’ अभियान सुरु केले. या अभियानातून मुलींना वाचवण्याचा संदेश देण्यात आला. परंतु सध्या जिल्हाभरात याबाबत अफवा पसरून पैसे उकळण्याचा धंदा जोरात सुरू आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सरकारने मुलींचा जन्मदार वाढविण्यासाठी देशात ‘बेटी बचाव - बेटी पढाव’ अभियान सुरु केले. या अभियानातून मुलींना वाचवण्याचा संदेश देण्यात आला. परंतु सध्या जिल्हाभरात याबाबत अफवा पसरून पैसे उकळण्याचा धंदा जोरात सुरू आहे. योजनेच्या नावाने फॉर्म तयार करून ते पोस्टाने पाठविले जात असून, आतापर्यंत जालना शहरातील ४ हजार नागरिकांनी हे अर्ज भरले असल्याची माहिती पोस्ट आॅफीसतर्फे देण्यात आली.
देशात दिवसेंदिवस मुलींच्या प्रमाणात घट होत आहे. हे प्रमाण वाढावे, मुलगा- मुलगी असा भेदभाव नष्ट करणे यासह स्त्री भृणहत्या कमी व्हाव्या, यासाठी समाजात जनजागृती करण्यासाठी २०१४ साली सरकारने मुलगी वाचवा-मुलगी शिकवा अभियान सुरू केले आहे. त्यानुसार याबाबत जनजागृतीही करण्यात येत आहे. परंतु, या अभियानाविषयी अफवा पसरवून मुलगी असलेल्या कुटुंबाची फसवणूक करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
शहरात काही तरुण बेटी बचाव - बेटी पढाव या योजनेची माहिती घरोघरी जाऊन देत आहे. त्यानंतर झेरॉक्सच्या दुकानातून नागरिक योजनेचा फॉर्म घेऊन त्याला महत्वाची कागदपत्रे जोडून ती पोस्टाने पाठवत आहे. मागील आठ दिवसांपासून जिल्हाभरात हा प्रकार घडत असून, आतापर्यंत जालना जिल्ह्यातील ४ हजार नागरिकांनी हे अर्ज भरले आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. दरम्यान, याबाबत जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी खरात यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मिटिंगमध्ये असल्याचे सांगितले.
दरम्यान, आठ दिवसांपासून सुरु असलेल्या या प्रकाराकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष दिसत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
शिक्षणासाठी कर्जाच्या थापा
जिल्ह्यात बेटी बचाव -बेटी पढाव योजनेच्या नावाने फॉर्म वाटण्यात आले असून, त्यासाठी पन्नास ते शंभर रूपयांपर्यंत पैसे घेण्यात येत आहे. या योजनेतंर्गत मुलींना शिष्यवृत्ती, शिक्षणासाठी कर्ज अशा विविध थापा मारण्यात येत आहे. अनेकांनी हे फॉर्म भरले असून काही जण आपले सरकार सेवा केंद्रातही अर्ज भरण्यासाठी येत असल्याचे समोर येत आहे.
या योजनेसाठी शहरातील शिवाजी महाराज चौक येथील पोस्ट आॅफिसमध्ये नागरिक फॉर्म भरण्यासाठी रांगा लावत असून, दररोज ३०० ते ४०० अर्ज नागरिक भरीत आहे. दरम्यान, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नागरिकांची फसवणूक सुरु आहे. ग्रामीण भागात अर्ज भरण्यासाठी तीनशे ते चार रुपये घेतले जात आहे.
झेरॉक्स सेंटरही करतात लूट
शहरातील काही झेरॉक्स सेंटरमध्ये या योजनेचे फॉर्म मिळत आहे. झेरॉक्स सेंटर चालक २ रुपयांचे फॉर्म ५ रुपयाला देत आहे. तसेच झेरॉक्सवरही जास्तीचे पैसे आकारल्या जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
नांदेड, लातूरनंतर आता जालन्यात
बेटी बचाव - बेटी पढाव या योजनेच्या नावाखाली नांदेड, लातूर, परभणी, हिगोंली येथील अनेक नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यानंतर याचे जळे जिल्हाभरात पोहोचले असून, शहरातील नागरिकही मोठ्या प्रमाणात फॉर्म भरत आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
मागील आठ दिवसांपासून जिल्हाभरात ही फसवणूक सुरू आहे. मात्र, अद्यापही प्रशासने कुठल्याही हलचाली केल्या नाही. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.