जुई धरणात साचलाय ४० टक्के गाळ...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:57 AM2018-11-17T00:57:25+5:302018-11-17T00:57:35+5:30
भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात ४० टक्के गाळ साचला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
दानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात ४० टक्के गाळ साचला आहे. सुरूवातीच्या काळात धरणात १० द.ल.घ.मी. पाणी साठवण क्षमता होती. आजरोजी या धरणात केवळ ६ द.ल.घ.मी. पाणी साठवण क्षमता झाल्याची माहिती जुई धरण स्थापत्तीय अभियंता आर. एन. दरबस्तवार यांनी दिली.
मुंबई येथील समस्त महाजन ट्रस्टच्यावतीने गाळ काढण्यासाठी दोन पोकलॅन उपलब्ध करुण दिले होते. दानापूर येथील जुई धरणाला जलसंधरण मंत्री राम शिंदे यांनी ४ एप्रिल २०१८ रोजी भेट दिली होती. हे धरण गाळ मुक्त करू, असे आश्वासन त्यांनी त्यावेळी दिले होते. त्यानुसार ९ एप्रिल ते १० जून २०१८ पर्यंत मोठ्या प्रमाणावर गाळ उपसा करण्यात आला होता.
हे धरण आजरोजी १०० टक्के कोरडे आहे. हे धरण पूर्णपणे गाळमुक्त करण्यासाठी शासनातर्फे गाळ मुक्त मोहिम हाती घेणे गरजेचे आहे.
पूर्णपणे गाळ उपसा केल्यास परिसरातील २५ गावांना याचा फायदा होणार आहे. तसेच भविष्यात गाळमुक्त करून समाधान पाऊस झाल्यासही पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटू शकेल असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. सन १९७६ ते २००० पर्यंत या परिसरात ऊसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. परंतु धरणात जसे जसे गाळ वाढत गेले त्यामुळे धरणाची पाणी क्षमता कामी कमी होत गेली आणि परिसरातील बागायत क्षेत्र ही कमी होत गेले. ही बाब लक्षात घेऊन गाळ मोहिम राबविण्याची गरज आहे.