जालन्यातून चोरीला गेलेल्या ४० पोते तुरीचा झाला उलगडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 04:28 PM2018-12-29T16:28:07+5:302018-12-29T16:32:21+5:30
नवीन मोंढा भागातून ४० पोते तुरीची चोरी उलगडण्यास चंदनझिरा पोलिसांना यश आले आहे.
जालना : नवीन मोंढा भागातून ४० पोते तुरीची चोरी उलगडण्यास चंदनझिरा पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून १ लाख २० हजाराची तुर जप्त करण्यात आली आहे. शेख रहीम शेख अब्दुल (ह.मू. नारेगाव, मुळ रा. उत्तरप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे.
सय्यद सादीक सय्यद नुर, ( रा, बाबर कॉलनी, औरंगाबाद) यांनी २० डिसेंबर रोजी चालकाला आयशर मधून अहमदनगर येथील गुरुदत्त ट्रान्सपोर्ट येथून पावती घेऊन शेवगा-पाथर्डी येथे जावून २०० पोत तुर ट्रकमध्ये भरुन जालना येथे पोहच करण्याचे सांगितले. परंतु, चालकाने माल वेळेत पोहच केला नाही. तसेच त्याचा मोबाईलही बंद होता. त्यानंतर फिर्यादीने जालना येथील नविन मोंढा भागात गाडीचा शोध घेतला असता, गाडी नवीन मोंढा गेट जवळ मिळाली. यातील माल चेक केला असता, त्यामध्ये ४० पोते तुर कमी असल्याचे लक्षात आले. यावरुन सय्यद सादीक सय्यद नुर यांच्या फिर्यादीवरुन चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यानंतर पोलिसांनी चालकाबाबत फिर्यादीकडे विचारपुस केली असता, त्यांनी चालकास ७ ते ८ दिवसापूर्वीच एका ओळखीच्या व्यक्तीमार्फत कामाला ठेवले होते. या माहितीवरून त्याला कामाला लावलेल्या व्यक्तीला ताब्यात घेवून त्याची विचारपूस केली असता, त्याने चालक हा औरंगाबाद येथील नारेगाव येथे राहत असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी चालकास नारेगाव येथून ताब्यात घेवून त्याची विचारपूस केली असता, त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून ४० पोते तुर जप्त करण्यात आली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधीक्षक शिलवंत ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. बाळासाहेब पवार, पोउपनि. प्रमोद बोंडले कर्मचारी नंदलाल ठाकूर, अनिल काळे यांनी केली.
का केली चोरी
चालक हा नवीन मोंढा भागात तुर घेवून गेला असता, त्याच्याकडून व्यापाऱ्यांनी माल विकत घेतला नाही. म्हणून त्यांने ४० पोते तुर मोंसबी मार्केट च्या बाजूला एका ठिकाणी भिंती लगत ठेवली होती.