शौचालयासह १४ व्या वित्त आयोगाच्या कामात ४१ लाखांचा अपहार
By दिपक ढोले | Published: August 31, 2022 01:53 PM2022-08-31T13:53:57+5:302022-08-31T13:55:14+5:30
डोणगाव येथील तत्कालीन ग्रामसेवकासह सरपंचाविरुध्द गुन्हा दाखल
जालना : शौचालयासह १४ व्या वित्त आयोगाच्या कामांमध्ये अनियमितता करून ४० लाख ९१ हजार ३३५ रूपयांचा अपहार केल्या प्रकरणी जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथील तत्कालीन ग्रामसेवकासह सरपंचाविरुध्द टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तत्कालीन ग्रामसेवक प्रदीप अर्जून तांबिले व तत्कालीन सरपंच गंगाधर राधाकिसन खरात (रा. डोणगाव) यांनी संगणमत करून २०१२ ते २०२० या कालावधीत डोणगाव येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाची ३० लाख रूपयांची कामे केली. शिवाय, १४ व्या वित्त आयोगांतर्गत १० लाख ९१ हजार ३३५ रूपयांची कामे केली. ही कामे बोगस केल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
या तक्रारीवरून सीईओंनी जाफराबाद पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नारायण तुकाराम खिल्लारे (५४) यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यांनी चौकशी करून सीईओंकडे अहवाल सादर केला. यात ४० लाख ९१ हजार ३३५ रूपयांचा अपहार झाल्याचे नमूद करण्यात आले. याप्रकरणी विस्तार अधिकारी नारायण खिल्लारे यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन ग्रामसेवक प्रदीप तांबिले, गंगाधार खरात यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.