वर्षभरात ४२९ जणांचे जुळले नव्याने संसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 12:20 AM2019-05-05T00:20:55+5:302019-05-05T00:21:24+5:30
महिला तक्रार निवारण केंद्रात गेलेल्या ६८० जोडप्यांपैकी ४२९ जोडप्यांचे संसार पुन्हा जुळविण्यात जालना पोलिसांना यश आले आहे.
दीपक ढोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : घरातील किरकोळ कारणावरून झालेल्या वादावरून पती-पत्नी घटस्फोटापर्यंत जातात; परंतु हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी महिला तक्रार निवारण केंद्रात गेलेल्या ६८० जोडप्यांपैकी ४२९ जोडप्यांचे संसार पुन्हा जुळविण्यात जालना पोलिसांना यश आले आहे. मोबाईलवरील संभाषण मॅसेज, संशय अशी विविध किरकोळ कारणे, घरातील पती-पत्नीच्या वादासाठी कारणीभूत ठरत आहेत.
१९९६ पासून जालना पोलिसांच्या वतीने महिला तक्रार निवारण केंद्र तालुका जालना पोलीस ठाण्याच्या बाजूच्या इमारतीमध्ये सुरु झाले. सुरुवातीला जनजागृती व माहितीचा अभाव असल्याने तक्रारींची संख्या खूपच कमी होती. १९९६ साली ३५ अर्ज आले होते. पैकी २६ प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात तक्रार निवारण केंद्राला यश आले. त्यानंतर ही कामगिरी वृद्धिंगत होत गेली. एकाने दुसऱ्याला, दुस-याने तिस-याला सांगत गेल्याने आज तक्रारींचा आकडा ६०० वर गेला आहे. हाच धागा पकडून पती-पत्नींमध्ये कोणत्या कारणावरुन वाद होतात याचा आढावा शनिवारी ‘लोकमत’ने घेतला. यावेळी संशय, मोबाईल व ईगो या कारणावरुन सर्वात जास्त भांडणे होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. असे असले तरी दोघांना बोलावून घेत त्यांचे समुपदेशन करीत पुढे निर्माण होणा-या दुष्परिणामांची जाणीव करुन दिली जाते. या समुपदेशनामुळे २०१८ या वर्षात तब्बल ४२९ प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात यश मिळवले आहे. हा आकडा कौतूकास्पद असल्याचे सांगण्यात आले.
असे होते समुपदेशन
सुरुवातीला पीडितेची तक्रार तिच्या हस्ताक्षरात घेतली जाते. त्यानंतर समोरच्या व्यक्तीला महिला तक्रार निवारण केंद्रातून संबंधित पोलीस ठाण्यातर्फे नोटीस पाठविली जाते. ठरलेल्या तारखेस हजर राहण्यास सांगितले जाते. दोघांनाही समोरासमोर आणून त्यांची अडचण जाणून घेतली जाते. त्यानंतर त्यावर मार्ग काढण्यासाठी समुपदेशन केले जाते. त्यांना कायद्याचे मार्गदर्शन केले जाते.
वाईट परिणामांची जाणीव करुन दिली जाते. वारंवार तारीख देऊन त्यांचे मनपरितर्वन करण्याचा प्रयत्न होतो. तरीही प्रकरण मिटले नाही तरी संबंधित पोलीस ठाण्याला पत्र पाठवून समोरच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यास सांगितले. स्थानिक पोलीस निरीक्षकांच्या स्वाक्षरीने हे पत्र पाठविले जाते.