४४ कर्मचारी गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:40 AM2018-03-15T00:40:46+5:302018-03-15T00:41:31+5:30
मंठा पंचायत समितीचा बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पंचनामा करण्यात आला. यावेळी एकूण ५५ कर्मचा-यांपैकी ४४ कर्मचारी गैरहजर आढळून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंठा : तालुक्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्यालय असणाऱ्या मंठा पंचायत समितीचा बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पंचनामा करण्यात आला. यावेळी एकूण ५५ कर्मचा-यांपैकी ४४ कर्मचारी गैरहजर आढळून आले. यातील ७ कर्मचारी दौ-यावर असल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात त्याची रजिस्टरमध्ये नोंद केली नसल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे पंचायत समिती कार्यलयाचा पंचनामा होण्याची ही चौथी वेळ असून, इथल्या भोंगळ कारभाराला अद्याप सुधारला नसल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे.
विविध शासकीय कामांसाठी तालुक्यातुन शेकडो नागरिक पंचायत समिती कार्यालयास भेट देतात. एकतर हे कार्यालय शहरापासून तीन किलोमीटर दूर असल्याने सर्वसामान्य लोकांना पायपीट करावी लागते. किंवा रिक्षाचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. तालुक्यातील अनेक गावांत सध्या पाणीटंचाईच्या झळा बसत असल्याने अनेक गावांचे सरपंच , सदस्य व नागरिक पंचायत समितीला कामानिमित्त भेटी देतात. कार्यालयात गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा कर्मचारी, बांधकाम व आस्थापना कर्मचारी, रोहयोसारख्या महत्त्वाच्या विभागाचे कर्मचारी नेहमी गैरहजर असतात.बुधवारी सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी उपसभापती कल्याण खरात, दक्षता समितीचे अध्यक्ष अशोक वायाळ, पंजाब बोराडे , नागेश कुलकर्णी, सरपंच रामप्रसाद सुरनर, राम चव्हाण यांच्या उपस्थितीत कर्मचारी गैरहजर आढळल्याने कुलूप ठोकण्यात आले.
यानंतर प्रभारी नायब तहसीलदार किशोर तायडे, तलाठी जी.आर. कुटे यांना बोलावून पंचासमक्ष कर्मचारी अनुपस्थित असल्याचा पंचनामा करण्यात आला. या पंचनाम्यामध्ये ४२ कर्मचा-यांपैकी ३४ कर्मचारी गैरहजर होते, तर १३ कंत्राटी कर्मचा-यांपैकी १० कर्मचारी गैरहजर होते. एकूण ५५ पैकी ४४ कर्मचारी गैरहजर आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. या गैरहजर कर्मचा-यांवर काय कार्यवाही होते, याकडे मंठा वासियांचे लक्ष लागून आहे.
विशेष म्हणजे यापुर्वी पंचायत समिती कार्यालयाचे तीन वेळा पंचनामे करण्यात आले. प्रत्येक वेळी मोठ्या प्रमाणात कर्मचारी गैरहजर आढळून येतात. याकडे वरिष्ठ अधिकारी वारंवार दुर्लक्ष करीत असल्यामुळे कर्मचारी आशा पंचनाम्यांना जुमानत नाहीत.
पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या मतदार संघातील असलेल्या या पंचायत समिती कार्यालयाचा भोंगळ कारभार सुधारणार कधी तरी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. वरिष्ठ अधिका-यांकडून गैरहजर कर्मचा-यांवर काय कारवाई होते, याकडे लक्ष आहे.