६४ पैकी ४५ प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’च्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:32 AM2021-09-18T04:32:42+5:302021-09-18T04:32:42+5:30
जालना : जिल्ह्यात गत आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे ६४ पैकी तब्बल ४५ प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ होण्याच्या मार्गावर आले आहेत. या ...
जालना : जिल्ह्यात गत आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे ६४ पैकी तब्बल ४५ प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ होण्याच्या मार्गावर आले आहेत. या प्रकल्पांमध्ये ७५ टक्क्यांहून अधिकचा उपयुक्त पाणीसाठा झाला आहे; परंतु अद्यापही चार प्रकल्पांत मृत पाणीसाठा तर ८ प्रकल्पांत केवळ २५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.
गत आठवड्यात जिल्ह्याच्या विविध भागांत दमदार पाऊस झाला. सलग पाच-सहा दिवस पडलेल्या पावसामुळे खरिपातील पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. शिवाय नदी, ओढ्यांच्या काठी असलेल्या शेतजमिनी खरडून गेल्या आहेत; परंतु दुसरीकडे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक मात्र समाधानकारक झाली आहे. परिणामी, जिल्ह्यातील ६४ पैकी तब्बल ४५ प्रकल्पांमध्ये ८५ टक्क्यांहून अधिकचा उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. त्यातील काही प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ झाले असून, इतर प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ होण्याच्या मार्गावर आहेत. या खालोखाल तीन प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्क्यांच्या मध्ये उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. चार प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्क्यांच्या मध्ये तर आठ प्रकल्पांमध्ये केवळ २५ टक्क्यांपर्यंत उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तर अद्यापही चार प्रकल्पांमध्ये मृत पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये एकूण ७८.७० टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. यात मध्यम प्रकल्पांमध्ये ७३.१७ टक्के तर लघु प्रकल्पांमध्ये ८०.९५ टक्के पाणीसाठा झाला आहे. बहुतांश मध्यम प्रकल्पांमध्येही पाण्याची आवक समाधानकारक झाली आहे.
चौकट
अनेक गावांचा पाणीप्रश्न मार्गी
जिल्ह्यातील सात मध्यम आणि इतर लघु प्रकल्पांवर जिल्ह्यातील बहुतांश सर्वच शहरी, ग्रामीण भागाला पाणीपुरवठा केला जातो. मोजके प्रकल्प वगळता इतर प्रकल्पांमध्ये सद्य:स्थितीत समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे या गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. शिवाय आगामी काळातील रबी हंगामातही पिकांना पाणी उपलब्ध होणार आहे. याचा शेतकऱ्यांनाही लाभ होणार आहे.
मध्यम प्रकल्पांची स्थिती
प्रकल्प पाणीसाठा
कल्याण गिरजा, जालना १०० टक्के
कल्याण मध्यम, जालना ६०.३९ टक्के
अप्पर दुधना, बदनापूर ३०.१७ टक्के
जुई मध्यम, भोकरदन १०० टक्के
धामना मध्यम, भोकरदन १०० टक्के
जीवरेखा प्रकल्प, जाफराबाद १६.९७ टक्के
गल्हाटी प्रकल्प, अंबड १०० टक्के
फोटो