जालना जिल्हाभरात तीन वर्षात साडेचार हजार घरकुलांचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:21 AM2019-06-25T00:21:27+5:302019-06-25T00:21:58+5:30
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात सन २०१६-१७ ते २०१८-१९ या दरम्यानच्या तीन वर्षात एकूण ५ हजार ८६१ घरकुलांच्या कामांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी आजवर ४ हजार ९४२ घरकुलांची कामे पूर्ण झाली
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात सन २०१६-१७ ते २०१८-१९ या दरम्यानच्या तीन वर्षात एकूण ५ हजार ८६१ घरकुलांच्या कामांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी आजवर ४ हजार ९४२ घरकुलांची कामे पूर्ण झाली असून, अद्यापही ९१९ घरकुलांचे काम अपूर्ण आहेत.
सर्वसामान्य गरीब कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना अंमलात आणली. त्यानुसार प्रत्येक लाभार्थ्याला १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. हे अनुदान शासनाकडून चार टप्प्यात दिले जाते. या योजनेंतर्गत जालना जिल्ह्यात दरवर्षी घरकूल बांधकामांना मंजुरी प्रदान करण्यात येते. शिवाय शासनाकडूनच जिल्ह्याला घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट दरवर्षी मिळत असते.
२०१६-१७ ते २०१८-१९ या तीन वर्षाच्या कालावधीत जिल्ह्याला एकूण ५ हजार ९५८ घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रशासनातर्फे ५ हजार ८६१ घरकूल बांधकामांना मंजुरी प्रदान करण्यात आली.
त्यापैकी ४ हजार ९४२ घरकुलांची कामे पूर्ण झाली असून, ९९१ घरकूलांचे काम अद्यापही अपूर्णच असल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी सूर पसरला आहे.
२०११ साली करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात १२ हजार ३४६ कुटूंब या योजनेसाठी पात्र होते. मात्र, ५ हजार ८४८ कुटुंबांनाच मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना पात्र असूनही घरकूल मिळाले नाही. त्यांना २०१९-२० या वर्षी घरकूल देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.