४७ हजार ६१२ शेतकऱ्यांची महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:24 AM2020-12-25T04:24:43+5:302020-12-25T04:24:43+5:30
जालना : कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी असलेल्या सर्व कृषी विषयक योजना महाडीबीटी पोर्टलमधून एकाच अर्जाद्वारे दिल्या जाणार आहेत. आजवर ...
जालना : कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी असलेल्या सर्व कृषी विषयक योजना महाडीबीटी पोर्टलमधून एकाच अर्जाद्वारे दिल्या जाणार आहेत. आजवर या महाडीबीटी पोर्टलवर जिल्ह्यातील ४७ हजार ६१२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
शेतकऱ्यांसाठी शासनस्तरावरून विविध शासकीय योजना सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, या योजनांचा लाभ घेताना शेतकऱ्यांना कागदपत्राची जुळवाजुळव करणे ते अर्ज दाखल करेपर्यंत मोठी धावपळ करावी लागते. यात शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा खर्च होत होता. ही बाब पाहता शासनाने कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या शेतकरी योजना महाडीबीटी पोर्टल अंतर्गत एकाच अर्जाद्वारे देण्याचा निर्णय घेतला आहे. या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे. सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील ४७ हजार ६१२ शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज दाखल केले आहेत. या पोर्टलवरून येणाऱ्या अर्जांची लॉटरी पद्धतीने निवड करणे, पूर्व संमती देणे आदी प्रक्रिया ऑनलाईन होणार असून, अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची योजनांसाठी होणारी धावपळ आता थांबणार आहे.
कशी कराल नोंदणी?
ज्या शेतकऱ्याला शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी शासनाच्या महाडीबीटी पोर्टल या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. आपला मोबाईल क्रमांक शेतकऱ्यांना आधार कार्डशी लिंक करावा लागणार आहे. आधारशी मोबाईल क्रमांक लिंक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरून, संगणकातून किंवा सामुदायिक सेवा केंद्रातून ऑनलाईन अर्ज करून शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे.
शेतकऱ्यांनी अर्ज करावेत
शासनाने सुरू केलेल्या महाडीबीटी पोर्टल अंतर्गत येणाऱ्या अर्जांची छाननी, पूर्वसंमती, अनुदान वाटप ही प्रक्रिया आता ऑनलाईन होणार आहे. शिवाय शेतकऱ्यांना एकाच अर्जावर शासकीय योजनांचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गरजू शेतकऱ्यांनी ३१ डिसेंबर पूर्वी योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावेत.
- विजय माईनकर
कृषी उपसंचालक, जालना
योजनेचा लाभ होईल
शासनाने महाडीबीटी पोर्टलद्वारे एकाच अर्जातून शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ देण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे या महाडीबीटी पोर्टलचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. यापूर्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कागदपत्रांसह विविध प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी करावी लागणारी कसरतही आता थांबणार आहे.
- भास्कर पडूळ
शेतकरी, अंतरवाला
या योजनांसाठी आता एकच अर्ज
महाडीबीटी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण, कांदा चाळ, रोटाव्हेटर, ट्रॅक्टर, मळणी यंत्र, शेडनेट, अवजार बँक यासह इतर विविध योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे घेता येणार आहे. शासनाने सुरू केलेल्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांची शासकीय योजनांसाठी होणारी धावपळ, वाया जाणारा खर्च आणि मानसिक त्रासही कमी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी निर्धारित वेळेत ऑनलाईन अर्ज दाखल करणे गरजेचे आहे.