प्रकल्पांमध्ये ४८ टक्के उपयुक्त जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 12:17 AM2019-11-10T00:17:26+5:302019-11-10T00:18:05+5:30
परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ४७.९२ टक्के उपयुक्त पाणीसाठा वाढला आहे. जिल्ह्यातील एकूण ६४ पैकी ४० प्रकल्पांमध्ये हा उपयुक्त पाणीसाठा असून, इतर २३ प्रकल्प जोत्याखाली आहेत. तर एक प्रकल्प अद्यापही कोरडाठाक आहे
जालना : परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ४७.९२ टक्के उपयुक्त पाणीसाठा वाढला आहे. जिल्ह्यातील एकूण ६४ पैकी ४० प्रकल्पांमध्ये हा उपयुक्त पाणीसाठा असून, इतर २३ प्रकल्प जोत्याखाली आहेत. तर एक प्रकल्प अद्यापही कोरडाठाक आहे. प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने शहरी, ग्रामीण भागाचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे.
यंदा आॅक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत वार्षिक सरासरीच्या जवळपास ७५ टक्क्यांपर्यंत पाऊस झाला होता. त्यानंतर मात्र, परतीच्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६८८.२१ मिमी ओलांडत एकूण ८०० मिमीहून अधिक पाऊस जिल्ह्यात झाला. परिणामी जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ होण्यास मोठी मदत झाली आहे. जालना जिल्ह्यात एकूण ६४ मध्यम व लघू प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत ४७.९२ टक्के उपयुुक्त पाणीसाठा झाला आहे. यात १० प्रकल्पांमध्ये ७६ ते १०० टक्क्यांच्या मध्ये उपयुक्त पाणीसाठा आहे. ७ प्रकल्पात ५१ ते ७५ टक्क्यांच्या मध्ये, ५ प्रकल्पात २६ ते ५० टक्क्यांच्या मध्ये तर १८ प्रकल्पात २५ टक्क्यांपर्यंत उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. २३ प्रकल्प अद्यापही जोत्याखाली असून, केवळ एक प्रकल्प कोरडाठाक आहे. प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने बहुतांश भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांपैकी केवळ जालना तालुक्यातील कल्याण गिरीजा प्रकल्प जोत्याच्या पातळीखाली आहे. तर कल्याण मध्यम प्रकल्पात ३१.१८ टक्के, बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकल्पात १३.८८ टक्के, भोकरदन तालुक्यातील जुई प्रकल्पासह धामणा प्रकल्प १०० टक्के भरला आहे. जाफराबाद तालुक्यातील जीवरेखा प्रकल्पात ४८ टक्के तर अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्पात ६०.२६ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.