घनसावंगीतून सलग ५ विजय; गतवेळी मतविभाजनाने तारले, यावेळी राजेश टोपेंना जड जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 08:07 PM2024-10-26T20:07:12+5:302024-10-26T20:07:46+5:30

पाचवेळा आमदार तरी मतदार संघाच्या विकासाचे काय? जिल्ह्यात पक्ष देखील मजबूत झाला नाही

5 wins in a row, last time saved by split vote; At this time, Rajesh Tope will be heavy, the tune in Ghansawangi | घनसावंगीतून सलग ५ विजय; गतवेळी मतविभाजनाने तारले, यावेळी राजेश टोपेंना जड जाणार

घनसावंगीतून सलग ५ विजय; गतवेळी मतविभाजनाने तारले, यावेळी राजेश टोपेंना जड जाणार

जालना : आजवरच्या निवडणुकांचा निकाल पाहता एखादा अपवाद पाहता मतविभाजनामुळे आ. राजेश टोपे यांना विजयाचा गुलाला उधळता आला आहे. परंतु यंदाची निवडणूक टोपे आणि समर्थकांना वाटते तितकी सोपी नाही. टोपेंविरोधात महायुतीकडून तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न आहे. विशेषत: यंदाच्या निवडणुकीत टोपे यांना सामाजिक नाराजीचा मोठा फटका बसू शकतो, असे जाणकरांना वाटते.

१९९९ ते २०१९ या कालावधीत घनसावंगी (पूर्वीचा अंबड) मतदार संघातील मतदारांनी सलग पाच वेळा आमदार काम करण्याची संधी राजेश टोपे यांना दिली आहे. घनसावंगीचे आमदार आणि राज्य मंत्रीमंडळात मंत्री म्हणूनही टोपे यांना काम करण्याची संधी मिळाली आहे. २५ वर्षे प्रमुख पदावर असतानाही मतदार संघातील रस्ते, पाणी आणि विजेचा प्रश्न पूर्णपणे सोडविण्यात आ. टोपे यांना अपयशच आल्याचा आरोप महायुतीकडून केला जात आहे. विशेषत: मराठा आणि ओबीसी आंदोलनातील आ. टोपे यांच्या भूमिकेवर टीका झाली. त्यामुळे दोन्ही समाजातील नाराजीचा सामना यंदा टोपे यांना निवडणुकीत करावा लागणार आहे.

राष्ट्रवादी जिल्ह्यात मजबूत का झाली नाही
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार, अजित पवार यांनी वेळोवेळी आ. राजेश टोपे यांना पक्ष-संघटन वाढविण्यासाठी बळ दिले. महिला संघटन वाढावे, यासाठी सुप्रिया सुळेही नेहमीच जालन्याच्या दौऱ्यावर असायच्या. परंतु, घनसावंगी, अंबड वगळता इतर तालुक्यात राष्ट्रवादी वाढलीच नाही, अशी टिका पक्षातीलच नेते खासगीत करतात. विशेष म्हणजे पक्षाचे प्रमुखपद आपल्या जवळच्याच कार्यकर्त्याकडे सोपविल्याचा सूरही आवळला जात आहे. भोकरदनमध्ये माजी आ. चंद्रकांत दानवे यांच्यामुळे राष्ट्रवादी बळकट असली तरी इतर ठिकाणी मात्र पक्षाची वाताहत दिसून येते.

उसाचे राजकारण
काही वर्षांपूर्वी टोपे यांच्याच कारखान्याला ऊस द्यावा लागायचा. परंतु, त्यातही आपला आणि विरोधक असे मोठे राजकारण केल्याचा आरोप वेळोवेळी शेतकऱ्यांसह विरोधकांनी केला आहे. त्याला पर्याय म्हणून सतीश घाटगे आणि नंतर हिकमत उढाण यांनीही आपापले युनिट सुरू करून ऊस उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि टोपे यांच्या कारखान्यापेक्षा अधिक दर देण्याचा प्रयत्न केल्याचा सूरही निघतो. त्यामुळे उसाच्या राजकारणाचेही उत्तर निवडणुकीत मविआच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना द्यावे लागणार असल्याचे सांगितले जाते.

अजित पवारांनी दिल्या होत्या कानपिचक्या
राजेश टोपे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार जालन्यात आले होते. टोपे यांच्या घराकडे जाताना रस्त्यांची दुरवस्था आणि शहरातील अस्वच्छता पवारांच्या नजरेत आली होती. त्यावेळी अजित पवार यांनीही टोपे यांच्या घरीच कानपिचक्या दिल्याची चर्चा होती. या कानपिचक्यांवर राष्ट्रवादीच्या नाराज गटात चांगलीच चर्चा रंगली होती.

गत निवडणुकीतील मतदान: २०१९
राजेश टोपे- राष्ट्रवादी- १,०७,८४९
हिकमत उढाण- शिवसेना- १,०४,४४०
विष्णू शेळके- वंचित- ९२९३

Web Title: 5 wins in a row, last time saved by split vote; At this time, Rajesh Tope will be heavy, the tune in Ghansawangi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.