५० लाखांचे पॅकेज डावलून निवडली UPSC; जालन्याचा इंजिनिअर अभिजय पगारेची ८४४ वी रँक

By विजय मुंडे  | Published: May 24, 2023 12:48 PM2023-05-24T12:48:53+5:302023-05-24T12:50:54+5:30

साॅफ्टवेअर इंजिनिअर म्हणून चांगली नाेकरी आहे. परंतु, शासकीय नोकरीतून समाजाची सेवा करण्याची इच्छा आहे

50 lakhs package sidelined over UPSC exam; 844th Rank of Engineer Abhijay Pagar of Jalanya | ५० लाखांचे पॅकेज डावलून निवडली UPSC; जालन्याचा इंजिनिअर अभिजय पगारेची ८४४ वी रँक

५० लाखांचे पॅकेज डावलून निवडली UPSC; जालन्याचा इंजिनिअर अभिजय पगारेची ८४४ वी रँक

googlenewsNext

जालना : शहरातील अग्रसेननगर भागातील रहिवासी आणि बंगळूरू येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी करीत असलेल्या अभिजय विजय पगारे याने यूपीएससी परीक्षेत बाजी मारली आहे. यूपीएससीच्या मंगळवारी लागलेल्या निकालात अभिजय पगारे याला ८४४ वी रँक मिळाली आहे.

जालना शहरातील जेईएस महाविद्यालयातील उपप्राचार्य विजय पगारे यांचा मुलगा अभिजय पगारे याचे १२ वी पर्यंतचे शिक्षण जालना शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये झाले. त्यानंतर एनआयटी वारंगल येथे त्याने कॉम्पयुटर सायन्समध्ये पदवी मिळविली. पदवी मिळाल्यानंतर अभिजय पगारे याने बंगळूरू येथील एका कंपनीत सॉफ्टवेअर अभियंता म्हणून नाेकरी स्वीकारली. वार्षिक ५० लाख रूपयांचे पॅकेज असतानाही अभिजय पगारे याने आयएसएस हाेण्याचे स्वप्न पाहत गत चार वर्षापासून दैनंदिन ८ तासाची नाेकरी करून यूपीएससीची तयारी केली. 

पहिल्या प्रयत्नात तो मुलाखतीपर्यंत पोहोचला होता. परंतु, त्याला त्यावेळी अपयश आले. परंतु, हार न मानता आयएएस व्हायचे या हेतूने त्याने अभ्यासातील सातत्य कायम ठेवले. चालू वर्षात यूपीएससीची परीक्षा दिली आणि मंगळवारी लागलेल्या यूपीएससीच्या निकालात त्याने ८४४ वी रँक मिळविली आहे. प्राप्त रँकनुसार इंडियन फॉरेन सर्व्हिस किंवा इंडियन रेव्ह्यून्यू सर्व्हिस मध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. अभिजय पगारे याच्या या यशाबद्दल जालना शहरासह जिल्हाभरातून त्याचे कौतुक केले जात आहे.

अन् पालकांच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू
अभिजय पगारे हा गत चार वर्षापासून यूपीएससी परीक्षेची तयारी करीत होता. पहिल्या प्रयत्नात त्याला अपयश आले होते. परंतु, दुसऱ्या प्रयत्नात त्याने यश मिळविले. अभिजय पगारे याने युपीएससीत यश मिळाल्याची माहिती मिळाली त्यावेळी त्याचे वडिल विजय पगारे, आई कविता पगारे यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले होते.

शासकीय सेवेतून समाज सेवा
साॅफ्टवेअर इंजिनिअर म्हणून चांगली नाेकरी आहे. परंतु, शासकीय नोकरीतून समाजाची सेवा करण्याची आवड आहे. त्यामुळे मी प्रारंभीपासूनच आयएसए होण्याचे स्वप्न पाहत यूपीएससीची तयारी केली. आज यश मिळाल्याचे समाधान आहे. शिवाय आयएसएस होण्यासाठी आपले प्रयत्न कायम राहणार आहेत.
- अभिजय पगारे, जालना

Web Title: 50 lakhs package sidelined over UPSC exam; 844th Rank of Engineer Abhijay Pagar of Jalanya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.