आरोग्य विभागात नोकरीसाठी ५० हजारांची मागणी; दोघांविरुध्द गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 07:17 PM2022-05-07T19:17:30+5:302022-05-07T19:18:04+5:30
जिल्हा आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत निघालेल्या कंत्राटी पदांच्या भरतीसाठी केली पैस्यांची मागणी
जालना : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध कंत्राटी पदाच्या भरतीसाठी अर्ज केलेल्यानंतर यादीत नाव आलेल्या उमेदवारांना अंतिम निवड यादीत पात्र करण्यासाठी कॉल करून ५० हजार रुपयांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी महिला उमेदवार एलिझाबेथ संजय कांबळे (३६ रा. क्रांतीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन संशयितांविरुध्द कदीम जालना पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एलिझाबेथ कांबळे यांनी जिल्हा आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत निघालेल्या कंत्राटी पदांच्या भरतीसाठी अर्ज केला होता. यातील पात्र व अपात्र उमेदवारांची यादी २९ एप्रिल २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर जाहीर झाली. यामध्ये एलिझाबेथ कांबळे यांचे नाव पात्र उमेदवारांमध्ये होते. तसेच काही आक्षेप असेल तर उमेदवारांना २ मे पर्यंत अर्ज करण्याची संधी देण्यात आली होती. ३ मे रोजी एलिझाबेथ यांच्या पतीच्या मोबाईल क्रमांकावर हिंदी भाषेत बोलणाऱ्या अमित मिश्रा नावाच्या व्यक्तीचा फोन आला.
मी आरोग्य विभागात डाटा ऍण्ट्री ऑपरेटर आहे. तुमच्या पत्नी आरोग्य भरतीच्या स्टॉफनर्स पदासाठी अपात्र असून, त्यांना पात्र करून परमनंट करण्यासाठी मोठे साहेब प्रेमशंकर राठोड यांच्या खात्यावर काम होण्यापूर्वी २० हजार रुपये व काम झाल्यानंतर ३० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यांच्या पतीने हा प्रकार एलिझाबेथ कांबळे यांना सांगितला. मात्र, कुणीतरी फसवणूक करण्याच्या उद्देशाने हा कॉल केल्याचे लक्षात आल्यानंतर कांबळे दांपत्याने पैसे भरले नाही.
आरोग्य भरतीसाठी अर्ज केेलेले आरती शिहरे, सुरज पाटोळे, अर्चना हस्तक, कोमल कांबळे यांना अशाच प्रकारे पैशाची मागणी करण्यात आल्याचे समजले. मात्र, राहुल वर्मा, अमित शर्मा, प्रेमशंकर वानखेडे अशा नावाच्या व्यक्ती जालना आरोग्य विभागात कुठेच कार्यरत नसल्याची माहिती उमेदवारांनी घेतली. दरम्यान, फसवणूक करण्याच्या उद्देशाने मोबाईलवर संपर्क करून पैशांची मागणी करणाऱ्या संशयितांवर कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.