५१ वानरांना घातले पिंजऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:48 AM2018-12-19T00:48:53+5:302018-12-19T00:49:10+5:30
वनविभागाने मंगळवारी केलेल्या एका धरपकड मोहिमेत ५१ वानरांना जेरबंद केले आहे. यामुळे गावक-यांनी तूर्तास सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी : टेंभुर्णी येथे मागील काही महिन्यांपासून वानरांचा उपद्रव वाढला आहे. दरम्यान दिवसरात्र वानरांच्या कित्येक टोळ्यांनी गावालाच लक्ष बनविल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहे. याबाबत वानरांचा बंदोबस्त व्हावा म्हणून ग्रामस्थांनी वनविभागाकडे मागणी केली होती. याची दखल घेत वनविभागाने मंगळवारी केलेल्या एका धरपकड मोहिमेत ५१ वानरांना जेरबंद केले आहे. यामुळे गावक-यांनी तूर्तास सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
टेंभुर्णी येथे माकडांच्या वाढत्या धुमाकुळाने शाळकरी मुले, महिला, वृद्ध त्रस्त झाले होते.
अनेकदा या वानरांनी गावातील काही नागरिकांवर जीवघेणा हल्लाही केला होता.
दरम्यान मंगळवारी पहाटेच येथील बाजारपेठेत पिंजरा लावून वन कर्मचा-यांनी ५१ वानरांना पिंज-यात पकडून जंगलात नेऊन सोडले. अचानक वानरांची ही धरपकड मोहीम सुरू होताच ग्रामस्थांनी हे दृष्य पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. ही कारवाई जाफराबादचे रेंजर वन अधिकारी श्रीकांत इटलोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे मंकी कैचर समाधान गिरी, कृष्णा गिरी, संदीप गिरी, खुशाल शिंगे यांच्या पथकाने केली.