जालना जिल्ह्यातील ४८ प्रकल्पांमध्ये ५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 08:18 PM2020-08-14T20:18:14+5:302020-08-14T20:19:25+5:30

जिल्ह्यातील ५७ लघु प्रकल्पांपैकी पाच प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत.

51% usable water storage in 48 projects in Jalna district | जालना जिल्ह्यातील ४८ प्रकल्पांमध्ये ५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

जालना जिल्ह्यातील ४८ प्रकल्पांमध्ये ५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

googlenewsNext
ठळक मुद्देमध्यम प्रकल्पांमध्ये ६३ टक्के जिल्ह्यातील १६ प्रकल्पांमध्ये मृतसाठा

जालना : यंदा जिल्ह्यात वेळेवर आणि मुबलक प्रमाणात पाऊस झाला आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील ६४ पैकी ४८ प्रकल्पांमध्ये ५०.९९ टक्के पाणीसाठा झाला आहे. विशेषत: मध्यम प्रकल्पात ६३.६४ टक्के पाणीसाठा झाल्याने शहरी, ग्रामीण भागातील पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील १६ प्रकल्पांमध्ये अद्यापही मृत पाणीसाठा आहे. 

जून महिन्याच्या प्रारंभीपासूनच जिल्ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील नद्या, नाल्यांना पूर आला आहे. नद्या दुथडी वाहिल्याने जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्यात वाढ होत आहे. जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांमध्ये ६३.६४ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यात भोकरदन तालुक्यातील जुई, धामणा व जाफराबाद तालुक्यातील जीवरेखा मध्यम प्रकल्प ओसंडून वाहिला आहे. तर अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्पात ८४.३९ टक्के पाणीसाठा झाला आहे. 

बदनापूर तालुक्यातील अपर दुधना प्रकल्पात ६८.३९ टक्के, जालना तालुक्यातील कल्याण गिरजा प्रकल्पात २९.८९ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर कल्याण मध्यम प्रकल्पात अद्याप अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. जिल्ह्यातील ५७ मध्यम प्रकल्पांमध्ये ५२.५९ दलघमी म्हणजे ४३.७८ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील एकूण ६४ प्रकल्पांपैकी १६ प्रकल्प आजही जोत्याखाली आहेत. १२ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपर्यंत उपयुक्त पाणीसाठा आहे. १३ प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्क्यांच्या दरम्यान तर १२ प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्क्यांच्या दरम्यान उपयुक्त पाणीसाठा आहे. शिवाय जिल्ह्यातील आठ प्रकल्पांमध्ये ७६ टक्क्यांपेक्षा अधिक उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तर जिल्ह्यातील तीन प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत.


पाच लघु प्रकल्प तुडुंब 
जिल्ह्यातील ५७ लघु प्रकल्पांपैकी पाच प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. यात जाफराबाद तालुक्यातील भारज, शिंदी, बदनापूर तालुक्यातील आन्वी, भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को, रेलगाववाडी हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. इतर लघु प्रकल्पांमध्येही पाण्याची आवक समाधानकारक सुरू आहे.

पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी
जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये जवळपास ५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. विशेषत: भोकरदन, जाफराबाद, अंबड, बदनापूर तालुका व परिसरात दमदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे या भागातील प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला असून, शहरी, ग्रामीण भागाचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे.

Web Title: 51% usable water storage in 48 projects in Jalna district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.