चोरीला गेलेला ६० क्विंटल कापूस परत मिळाला; शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले
By दिपक ढोले | Published: February 24, 2023 07:11 PM2023-02-24T19:11:25+5:302023-02-24T19:11:44+5:30
घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथून चोरीस गेला होता ट्रक
जालना : आयशरसह ६० क्विंटल कापूस चोरीस गेल्याने शेतकरी ढसाढसा रडू लागला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या सहा तासांत आयशरसह कापूस परत मिळवून दिल्याने शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. ही घटना घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथे शुक्रवारी घडली. पोलिसांनी जवळपास ९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रांजणी येथील शेतकरी दत्ताभाऊ वरखडे यांनी २३ फेब्रुवारी रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास ६० क्विंटल कापूस आयशरमध्ये भरला. रांजणी येथीलच एका कृषी सेवा केंद्रासमोर आयशर उभा केले. सकाळी आठ वाजेच्या सुमारास दत्ताभाऊ वरखडे हे आयशर जवळ आले. त्यांना आयशर दिसला नाही. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी आले. याची माहिती घनसावंगी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. शिवाय, दत्ताभाऊ वरखडे यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, सदरील आयशर हे ६० ते ७० किलोमीटर गेल्यावर आपोआप बंद पडते. त्यावरून पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथके तैनात केली.
शिवाय, सर्व पोलिस ठाण्यांना याची माहिती देण्यात आली. त्याचवेळी सदरील आयशर एका ठिकाणी बंद असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी तत्काळ ते परत आणले. त्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. पोलिसांनी ९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, डीवायएसपी सुनील पाटील, पोनि प्रशांत महाजन, पोलिस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ, रामचंद्र खलसे, संजय जाधव, बाबासाहेब डमाळे, सुनील वैद्य, पोकॉ. गणेश मोरे, विनोद देशमाने, विठ्ठल वैराळ, कपिल अडियाल, गंगाराम कदम यांनी केली आहे.