६० धार्मिक स्थळे हटवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 12:01 AM2017-12-01T00:01:00+5:302017-12-01T00:01:04+5:30
जालना : शहरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम गुुरुवारी चौथ्या दिवशीही सुरूच होती. आतापर्यंत ६० हून अधिक धार्मिक स्थळे ...
जालना : शहरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम गुुरुवारी चौथ्या दिवशीही सुरूच होती. आतापर्यंत ६० हून अधिक धार्मिक स्थळे हटविण्यात आली असून, धार्मिक स्थळांना लागून असलेली अवैध दुकानेही जमीनदोस्त करण्यात येत आहेत.
गुरुवारी सकाळी भोकरदन नाका परिसरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात झाली. यामुळे जालना-औरंगाबाद रस्त्यावरील बसस्थानकाकडे जाणारी वाहतूक भोकरदन नाक्याहून संभाजीनगरमार्गे वळविण्यात आली होती. भोकरदन नाका परिसरातील दर्गा नसरुल्लाशाह कादरी परिसरातील काही कबरीही कारवाईत हटविण्यात आल्या. तसेच रस्त्यावर येत असलेली काही दुकानेही पाडण्यात आली. कारवाईच्या भीतीने काही नागरिकांनी रस्त्यावर येणारी आपली दुकाने स्वत:हून काढून घेतली. दुपारी दोन वाजेपर्यंत येथील कारवाई सुरू होती. मंठा चौफुली परिसरातील सात अतिक्रमणे हटविण्यात आली. तसेच अंबड चौफुली परिसरातील कल्पतरु अपार्टमेंट जवळील धार्मिक स्थळही हटविण्यात आले. गांधी चमन परिसरातील अतिक्रमणेही जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे कायम फळांच्या गाड्यांचा गराडा असलेला हा भाग मोकळा झाला आहे. धार्मिक स्थळांना लागून थाटण्यात आलेल्या टप-या, गॅरेज, ज्यूस, चहाविक्रीची दुकाने कारवाईत मोठ्या प्रमाणात हटविण्यात आली आहेत. आतापर्यंत एकूण ६० हून अधिक ठिकाणांवरील अतिक्रमणे हटविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, काही भागात अतिक्रमण हटविल्यानंतर काही नागरिक त्याच जागेवर दगडांच्या खुणा लावून पुन्हा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याकडे अतिक्रमण हटाव पथकाने लक्ष देण्याची गरज आहे.