विहिरीचे बिल काढण्यासाठी ६ हजारांची लाच; कृषी अधिकाऱ्यास एसीबीने पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 06:47 PM2022-07-14T18:47:36+5:302022-07-14T18:49:00+5:30
जाफराबाद पंचायत समिती कार्यालयात ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
जालना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेच्या विहिरीचे बिल काढण्यासाठी ६ हजारांची लाच घेताना जाफराबाद पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी पकडले आहे. प्रदीप महादेव जाधव (५७ रा. आदर्शनगर, जाफराबाद) असे संशयित आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर यांनी दिली.
तक्रारदार यांची बहीण परगावी राहण्यास असल्याने त्यांच्या शेत जमिनीचे संपूर्ण काम तक्रारदार पाहत आहेत. तक्रारदाराच्या बहिणीच्या नावे गाडेगव्हाण गावच्या हद्दीमध्ये असलेल्या शेतजमीन गट क्रमांक ७५ मध्ये जिल्हा परिषदेमार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत नवीन विहीर मंजूर झाली होती. त्यांना शासनातर्फे २,५०००० रुपयांचे अनुदान मिळणार होते. तक्रारदाराच्या विहिरीचे खोदकाम करून सदर बांधकाम बाबतचे दोन लाख रुपयांचे बिल यापूर्वी काढण्यात आले होते. सदर विहिरीवर कठडे बांधण्याबाबत शासनातर्फे ५० हजार रुपयांचे बिल येणे बाकी होते. जाधव यांनी तक्रारदाराकडे विहीर खोदकाम करण्यासाठी यापूर्वी काढलेले दोन लाख रुपयांच्या बिलाचे व सध्या सदर विहिरीचे कठडे बांधकामासाठी ५० हजार रुपयांचे बिल काढून देण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ६ हजार रुपये देण्याचे ठरले.
तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या तक्रारीनंतर जाफराबाद पंचायत समिती कार्यालयात सापळा रचून ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जाधव यांना पकडले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुदाम पाचोरकर, पोनि. शंकर मुटेकर, पोलीस अंमलदार गजानन घायवट, गजानन कांबळे, गणेश भुजाडे, मनोहर खंडागळे, प्रवीण खंदारे यांनी केली आहे.