जालना जिल्ह्यात ६१ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:35 AM2021-01-16T04:35:51+5:302021-01-16T04:35:51+5:30
जालना : जिल्ह्यात ४४६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकींसाठी शुक्रवारी मतदान झाले. सकाळी ७.३० वाजेपासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. सकाळपासूनच मतदानासाठी नागरिकांनी ...
जालना : जिल्ह्यात ४४६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकींसाठी शुक्रवारी मतदान झाले. सकाळी ७.३० वाजेपासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. सकाळपासूनच मतदानासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. जिल्ह्यात ६१.५८ टक्के मतदान झाले असून, १२३३२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये संपली होती. ४७५ पैकी २६ ग्रामपंचायतींची बिनविरोध निवडणूक झाली तर ४७८ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. ४४६ ग्रामपंचायतींच्या ३,६५३ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. १,४७९ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर मास्क व सॅनिटायझर ठेवण्यात आले होते. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पहिल्या दोन तासात ९.४७ टक्के मतदान झाले. साडेअकरा वाजेपर्यंत २८ टक्के मतदान झाले होते. तर साडेतीन वाजेपर्यंत ६१.५८ टक्के मतदान झाले. ७ लाख ७६ हजार ८३५ मतदारांपैकी ४ लाख ४३ हजार ३९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात २ लाख२७ हजार ४९६ पुरूष तर २ लाख १५ हजार ८९७ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील परतूर तालुक्यात ७३.२१ टक्के मतदान झाले. त्यानंतर जालना ६८.९७, बदनापूर ३१.६९, अंबड ५०.०८, घनसावंगी ७२.१९, परतूर ७३.२१, मंठा ५०.३३, भोकरदन ७२.०६ तर जाफराबाद तालुक्यात ६५.५८ टक्के मतदान झाले. ३,६५३ जागांसाठी १२३३२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
मंठ्यात पांगरी बु येथे अडीच तास मतदान खोळंबले
मंठा : तालुक्यात ५० ग्रामपंचायतींमध्ये सुरळीत मतदान पार पडले. मात्र, पांगरी बु. येथील वॉर्ड नंबर २ मध्ये ईव्हीएम मशीनला शाई लागल्याने उमेदवारांनी आक्षेप घेतला. त्यानंतर जवळपास अडीच तास मतदान बंद राहिले. तहसीलदार सुमन मोरे व पोलीस निरीक्षक विलास निकम हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ईव्हीएम मशीनचा पंचनाम करून दुसरे मशीन बसवले. त्यानंतर मतदानाला सुरूवात झाली. तालुक्यात २८ सदस्य अगोदरच बिनविरोध निवडून आले आहे. ९०१ उमेदवार रिंगणात असून, ३९० सदस्य निवडले जाणार आहेत.
परतूर तालुक्यातील नांद्रा येथे बाचाबाची
परतूर : तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींसाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ७३.२१ टक्के मतदान झाले. ३७ हजार ९०० मतदारांनी आपला हक्क बजावला. यात १८५७८ महिला तर १९३२२ पुरूषांचा समावेश आहे. दोन मतदान केंद्रांवर दोन मशीन बदलण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रूपा चित्रक यांनी दिली. सध्या शेतीची कामे सुरू असल्याने महिला व पुरूषांनी सकाळीच मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. परतूर तालुक्यातील नांद्रा येथे दोन गटात बाचाबाची झाली. या प्रकरणी माजी सरपंच किसन मुजमुले, नारायण मुजमुले, गजानन मुजमुले यांच्याविरुध्द परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बदनापुरात शांततेत मतदान
बदनापूर : तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींमध्ये ४३१ जागांसाठी शांततेत मतदान पार पडले. ११३४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. सकाळी ७.३० ते ९.३० दरम्यान संथ गतीने मतदान झाले. या काळात केवळ १०.९७ टक्के मतदान झाले. साडेनऊनंतर मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या. साडेतीन वाजेपर्यंत ६३.२८ टक्के मतदान झाले. तालुक्यात सर्वच ठिकाणी शांततेत व सुरळीत मतदान झाले.
अंबड येथे ५५७ उमेदवारांचे भवितव्य पेटीत बंद
अंबड : तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी शांततेत मतदान झाले. ५५७ उमेदवारांचे भवितव्य पेटीत बंद झाले आहे. सर्वच मतदान केंद्रावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे पालन करण्यात आले. तालुक्यात दुपारी दीड वाजेपर्यंत ४ टक्के मतदान झाले. सोमवारी मतमोजणी होणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
फोटो
बदनापूर तालुक्यातील खामगाव येथील मतदान केंद्रात ग्रामस्थांनी रांगा लावून मतदान केले. मात्रेवाडी मतदान केंद्रात दिव्यांग मतदार सखाराम पवळ हे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले होते.