६१ वर्षात १४ वर्षे महिलांनी भूषविले सरपंचपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:28 AM2020-12-22T04:28:49+5:302020-12-22T04:28:49+5:30

गणेश पंडित केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा ग्रामपंचायतीच्या ६१ वर्षाच्या इतिहासात चार महिलांना १४ वर्षे सरपंचपदी काम करण्याची संधी ...

In 61 years, women have held the post of Sarpanch for 14 years | ६१ वर्षात १४ वर्षे महिलांनी भूषविले सरपंचपद

६१ वर्षात १४ वर्षे महिलांनी भूषविले सरपंचपद

Next

गणेश पंडित

केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा ग्रामपंचायतीच्या ६१ वर्षाच्या इतिहासात चार महिलांना १४ वर्षे सरपंचपदी काम करण्याची संधी मिळाली. मात्र, अनेक महिलांच्या कार्यकाळात त्यांच्या घरातील पुरूषांनी किंवा सत्ताधारी गटातील प्रमुखाने पडद्यामागून सूत्रे हलविली. त्यामुळे गावातील महिलांविषयक प्रश्न कायम राहिले. ते प्रश्न ना पुरूष सरपंचांना सोडविता आले ना महिला सरपंचांच्या काळात सुटले!

आज अनेक क्षेत्रात महिला पुरूषांच्या बरोबरीने कामे करीत आहेत. त्यात राजकीय क्षेत्रही मागे राहिलेले नाही. शासनाकडून ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य, सरपंचपदाचे महिलांसाठी स्वतंत्र आरक्षण काढण्यात येत आहे. त्यामुळे आपसूकच महिलांना ग्रामपंचायतीचा म्हणजे गावाचा कारभार हाकून गावाला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी आपले योगदान देण्याचा मार्ग खुला झाला. केदारखेडा ग्रामपंचायतीच्या ६१ वर्षाच्या कालावधीतील चार महिलांच्या हाती १४ वर्षे सरपंचपद राहिले. गत पंचवार्षिक निवडणुकीत सात महिला सदस्य निवडून आल्या होत्या. त्यातील इंदुमती मुरकुटे यांनी नोव्हेंबर २०१५ ते नोव्हेंबर २०२० असे पाच वर्षे सरपंच म्हणून काम पाहिले. तर त्यापूर्वी कै. जाईबाई हिंमतराव तांबडे यांनी जानेवारी १९६६ ते डिसेंबर १९६६ असे एक वर्ष, कै. शांताबाई मधुकर तांबडे यांनी सप्टेंबर १९९५ ते सप्टेंबर २००० असे पाच वर्षे, येणूबाई विष्णू कांबळे यांनी सप्टेंबर २००२ ते नोव्हेंबर २००५ तीन वर्षे सरपंच म्हणून ग्रामपंचायतीचे कामकाज पाहिले.

महिलांना सरपंचपदी काम करण्याची संधी मिळाली असली तरी त्यांना गावाच्या विकासासाठी त्यांच्या संकल्पना प्रत्यक्षात उतरविता आलेल्या नाहीत. कधी पती, कधी मुलगा तर कधी सत्तेतील पदाधिकारी कामकाजात हस्तक्षेप करीत असल्याने त्यांच्या कामकाजावर त्याचा परिणामा झाला. विशेषत: या महिलांना काम करताना गावातील महिलांसाठी सोयी-सुविधांनीयुक्त सार्वजनिक शौचालय उभे करता आले नाही. जे शौचालय आहे तेथे सोयी-सुविधांचा अभाव आहे. गत वर्षी पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास आल्याने पाण्याची सोय झाली. मात्र, त्या योजनेपूर्वी पाण्यासाठी महिलांची अहोरात्र होणारी धावपळ वेगळीच होती. शिवाय महिलांसाठी असलेल्या शासकीय योजनाही गावात प्रभावीपणे राबविण्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष यापूर्वी झाले आहे. तेच दुर्लक्ष महिला सरपंच असतानाही केवळ पुरूषांच्या हस्तक्षेपामुळे झाल्याचे दिसून येत आहे. आजही महिलांशी निगडीत अनेक प्रश्न आहेत. महिलांच्या समस्या खऱ्या अर्थाने महिला सरपंच प्राधान्याने सोडवू शकतात. त्याही त्यांच्या संकल्पनेतून विकास कामे करता आली तर, अन्यथा पुरूषांचा कामकाजात हस्तक्षेप झाला तर त्यांना केवळ सहीपुरताच सरपंचपदाचा मान राहणार आहे आणि महिलांशी निगडीत प्रश्नही कायम राहणार आहेत.

१२४७ महिला मतदार

केदारखेडा गावात १२४७ महिला मतदार आहेत. यात प्रभाग एकमध्ये ३३७, प्रभाग दोनमध्ये ३६५, प्रभाग तीनमध्ये ३१८, प्रभाग चारमध्ये २२७ महिला मतदार आहेत. यात निवडणुकीत उभ्या राहणाऱ्या महिलांपैकी ६ महिलांची ग्रामपंचायत सदस्यपदी वर्णी लागणार आहे. तर ५ पुरूष सदस्य राहणार आहेत.

ग्रामीण भागात जुन्या संकल्पना कायम

महिला सरपंच चांगले काम करू शकतात. मात्र, पुरूषांच्या हस्तक्षेपामुळे महिलांची पदे ही केवळ नावाला उरली आहेत. कामकाज करताना कधी घरातील पुरूषांचा तर कधी सत्तेतील सहकाऱ्यांचा हस्तक्षेप होतो. आजही ग्रामीण भागात महिलांची चूल आणि मूल ही संकल्पना कायम आहे. मुलगी शिकली आणि प्रगती झाली ही बाब खरी आहे. मात्र, राजकारणात ते सूत्र लागू होत नाही.

इंदुमती मुरकुटे

माजी सरपंच, केदारखेडा

Web Title: In 61 years, women have held the post of Sarpanch for 14 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.