रोहयोच्या कामावर ६५०० मजूर कार्यरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 12:48 AM2019-07-08T00:48:29+5:302019-07-08T00:49:12+5:30
प्रशासनाने नियोजित केलेल्या रोहयोच्या कामांवर अद्यापही ६ हजार ६७१ मजूर काम करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पावसाळा सुरु होऊन महिन्याभराचा कालावधी उलटाला आहे. मात्र, अद्यापही भोकरदन तालुका वगळता जिल्ह्यात इतरत्र दमदार पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतीची कामे ठप्प असून, प्रशासनाने नियोजित केलेल्या रोहयोच्या कामांवर अद्यापही ६ हजार ६७१ मजूर काम करीत आहे.
गतवर्षी पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. परिणामी, नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशा दुष्काळी परिस्थिती नागरिकांचे स्थलांतर होऊ नये, त्यांच्या हाताला काम मिळावे, यासाठी शासनाच्यावतीने रोजगार हमी योजनेअतंर्गत कामे देण्यात आली. कामे सुरु झाल्यापासून या कामावर दिवसेंदिवस मजूरांच्या संख्येत वाढ होत होती. मे महिन्याच्या अखेर पर्यंत रोहयोच्या कामावरील मजूरांची संख्या २८ हजारापर्यंत पोहोचली होती. जून महिन्यात पावसाळा सुरु झाल्याने मजुरांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली. पावसाळा सुरु होऊन महिन्याभराचा कालावधी उलटाला आहे. अद्यापही जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दमदार पाऊस पडला नाही. परिणामी शेतातील कामेही ठप्प आहेत. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम नाही. मजुरांना काम मिळावे, म्हणून ग्रामपंचायतीकडून कामांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ७७९ ग्रामपंचायतीपैकी १७६ ग्रामपंचायती अंतर्गत सुरू असलेल्या कामांवर ६ हजार ६७१ मजूर कामावर आहे.
घनसावंगी तालुक्यातही कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतीसह बांधकामे व इतर कामे ठप्प आहेत. तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतीपैकी ३१ ग्रामपंचायतींमध्ये सर्वाधिक १ हजार ९०८ मजूर कार्यरत आहेत. तर मंठा तालुक्यात सर्वात कमी ८७ मजूर कामावर आहे.
शेतीची कामे दिवाळीनंतर आटोपल्यावर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दरवर्षी रोजगार हमी योजनेच्या कामाची मागणी वाढत असते. रोजगार हमी योजनेंतर्गत रस्ते, बोडी, खोलीकरण, सिमेंट बंधारे, नाला सरळीकरण, शौचालय, नाडेप कंपोस्ट, घरकूल, सिंचन विहीर यासह अनेक कामे केली जात असून, या कामावर मजूर कार्यरत आहेत.