जालना जिल्ह्यात पाच महिन्यांत ६६ जणांनी संपवली जीवनयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:24 AM2019-06-16T00:24:08+5:302019-06-16T00:24:24+5:30
गेल्या पाच महिन्यांत जिल्हाभरातील तब्बल ६६ जणांनी विविध कारणांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे.
दीपक ढोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, असे म्हणतात. मात्र, ताणतणावाच्या आयुष्यात प्रत्येकालाच हे शक्य होत नाही. दिवसेंदिवस प्रत्येक व्यक्तीचा ताणतणाव वाढत चालला आहे. गेल्या पाच महिन्यांत जिल्हाभरातील तब्बल ६६ जणांनी विविध कारणांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. या आत्महत्यांमध्ये गळफास घेऊन जीवन संपवणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे.
जीवनातील आव्हानाला व्यक्ती कंटाळली की, ती आत्महत्याकडेच वळते, असे म्हणतात. तणाव हा प्रत्येकाच्या आयुष्यात थोड्याफार फरकाने असतोच, मात्र आत्महत्या हा त्यावर उपाय नाही. गेल्या पाच महिन्यात जिल्हाभरातील ६६ जणांनी विविध कारणांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. गळफास घेऊन ४० जणांनी आत्महत्या केल्या, तर विष प्राशन करुन २० तसेच इतर प्रकारे ६ जणांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. अर्थिक, मानसिक, शारीरिक, कौटुंबिक, अती आदर्शवादी विचार अशी अनेक कारणे आत्महत्येमागे आहेत. जीवन खूप गतिमान झाल्याने स्वत: शी संवाद साधण्यासाठी वेळ दिला जात नाही. नात्यांसाठी वेळ दिला जात नाही. वास्तवापेक्षा आभासी जगात जास्त रमत आहेत. स्वत:चा स्वीकार करणे हे फार महत्वाचे असते, पण इतरांच्या नजरेतून स्वत: ची प्रतिमा जोखली जाते. सामाजिक प्रतिमेला जपण्याच्या आटोकाट प्रयत्नात क्षमतांचा विचार अपयश हा आयुष्याचा एक भाग आहे. मात्र, यातील अनेकजण ताणतणाव सहन न झाल्याने आत्महत्या करीत आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासनासह सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन जनजागृती मोहीम उभारण्याची गरज आहे.
गळफास घेतलेल्यांची संख्या जास्त
या आत्महत्येच्या घटनांमध्ये गळफास, रेल्वेखाली उडी मारणे, विष प्राशन करणे आदी प्रकारे आत्महत्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये गळफास घेऊन ४० तर विष प्राशन करुन २० जणांनी आत्महत्या केलेली आहे. ६ जणांनी इतर प्रकारे आपली जीवनयात्रा संपविली आहे.
समुपदेशनाची गरज
विवाहविषयक समुपदेशनाची गरज निर्माण होऊ लागली आहे. कारण, कुटुंबाची जबाबदारी, प्रेमभंग किंवा वैवाहिक संबंधातील अडचणींमुळे पुरुष मंडळींना नेहमी समस्यांना सामोरे जावे लागते. यावर वेळेच उपाययोजना न केल्यास ते मानसिक रोगी बनतात व नकळतपणे आत्महत्येचा प्रयत्न करतात.