कोम्बिंग आॅपरेशनला चोरांचा ठेंगा ! ७ चोऱ्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:46 AM2018-12-31T00:46:01+5:302018-12-31T00:46:12+5:30
अंबड तालुक्यातील लखमापुरी येथे शनिवारी रात्री सात ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारत लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सुखापुरी : अंबड तालुक्यातील लखमापुरी येथे शनिवारी रात्री सात ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारत लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. यात रोख ७२ हजारासह एक दुचाकी, चांदीचे दागिने, मोबाईल चोरट्यांनी लंपास केले. दरम्यान, या परिसरात पोलिसांकडून वेळोवेळी कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात येत आहे. परंतु, तरीही चो-यांचे सत्र थांबता थांबेना.
लखमापुरी येथील अशोक गंगाधर तांदळे यांच्या घरी रात्री चोरट्याने कम्पाउंड मधील गेट उघडून प्रवेश केला. मात्र चॅनलगेटला लावलेले कुलुप टॉमीच्या साहाय्याने तोडण्याचा प्रयत्न फसल्याने चोरट्याने व्हराड्यातच लावलेली दुचाकी पळविली. तसेच रुस्तूम भापकर यांच्या घरामधील पेटीत ठेवलेले रोख १५ हजार रुपये चोरट्यांनी पळविले. जवळच असलेल्या पाराजी पिसुळे यांच्या घरात घुसून चोरट्यांनी घराची झाडाझडती घेऊन घरगुती वापरातील वस्तू, चांदीचे जोडवे, ५ साड्या लंपास केल्या.
ऊसतोडीसाठी आलेल्या टोळीला देखील चोरट्यांनी लुटले. टोळी मुकादम रमेश बदु जाधव यांचे रोख २० हजार रुपये व एक फोन, विनायक फुलचंद जाधव यांच्या झोपडीतून २० हजार रुपये रोख, लक्ष्मण नीला जाधव यांच्या झोपडीतून ७ हजार रोख रक्कम, रायसल राठोड यांचे १० हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले.
चोरी झाल्याची माहिती मिळताच गोंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एच. व्ही. वारे, पोलीस कॉन्स्टेबल एन. एच. चव्हाण, अमर पोहार, ज्ञानेश्वर मराडे, योगेश दाभाडे यांनी पंचनामा केला. याकडे पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरज आहे.
नागरिकांमध्ये
भीतीचे वातावरण
मागील काही महिन्यापासून अंबड, शहगड, सुखापुरी, वडीगोंद्री या परिसरात मोठ्या प्रमाणात चोºयांचे प्रमाण वाढले आहे. यासाठी पोलीस विभागाकडून कॉम्बिंग, पेट्रोलिंग करण्यात येत आहे. परंतु, तरीही चोºयांचे सत्र सुरुच आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.