आव्हाना येथून चोरट्यांनी पळविले देशी दारूचे ७० बॉक्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 12:27 AM2019-07-04T00:27:11+5:302019-07-04T00:28:14+5:30
भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील शासनमान्य देशी दारूचे दुकान फोडून चोरट्यांनी दीड लाख रूपये किंमतीचे देशी दारूचे ७० बॉक्स चोरून नेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आव्हाना : भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील शासनमान्य देशी दारूचे दुकान फोडून चोरट्यांनी दीड लाख रूपये किंमतीचे देशी दारूचे ७० बॉक्स चोरून नेले. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.
आव्हाना येथे नामदेव राजाराम सरोदे यांचे शासनमान्य देशी दारूचे दुकान आहे. चोरट्यांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास या दुकानाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. दुकानातील जवळपास दीड लाख रूपये किमतीचे ८० देशी दारूचे बॉक्स चोरट्यांनी चोरून नेले. आव्हाना येथील घटनेची माहिती मिळताच भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर साखळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
यापूर्वी ८ जून रोजी याच दुकानात चोरी करून चोरट्यांनी दारूचे १५ बॉक्स लंपास केले होते.या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
मात्र, या घटनेचा तपास लागण्यापूर्वीच बुधवारी पहाटेच्या सुमारास दुसऱ्या वेळेस चोरट्यांनी या दुकानातील देशीदारूचे बॉक्स लंपास केले आहेत. याच दिवशी प्रमोद गावंडे यांचे पिंपळगाव रेणुकाई येथील दुकान फोडून चोरट्यांनी चोरी केली आहे. याप्रकरणी पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
गावात दहशत
एकच दुकान चोरट्यांनी दोन वेळेस फोडले आहे. चोरीच्या घटना वाढल्याने आव्हाना ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
‘एक्सपायर’ बॉक्स जैसे-थे
आव्हाना येथील देशी दारूच्या दुकानातून चोरट्यांनी ७० बॉक्स लंपास केले. मात्र, याचवेळी दुकानात ‘एक्सपायर’ झालेले बॉक्स होते. या बॉक्सला चोरट्यांनी हातही लावला नाही. त्यामुळे हे ‘एक्सपायर’ बॉक्स दुकानात ‘जैसे थे’ आले.
औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील देशी दारूच्या दुकानांना लक्ष्य करणारी टोळीच सक्रिय असल्याचे व्यावसायिकांमधून सांगण्यात आले.
पिंपळगाव, आव्हाना, अंधारी, भराडी आदी अनेक गावांत देशी दारूच्या दुकानात चोरी झाली आहे. त्यामुळे दुकान फोडणाऱ्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.